

Weather Update : मान्सूनने संपूर्ण देश व्यापला असून दिल्लीपासून ते केरळपर्यंत आणि महाराष्ट्र, राजस्थानपासून पश्चिम बंगाल, हिमाचलप्रदेशपर्यंत देशभरात पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने मुंबई आणि उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. भारतीय हवामान विभागाकडून शुक्रवारी १३ राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारी राज्यात पाऊस कोसळणार का? काय स्थिती आहे? हवामान विभागाने नेमकं काय सांगितले? राज्यातील उद्या पावसाची स्थिती काय असेल? जाणून घेऊयात...
शुक्रवारी महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
राज्यात पावसाने आठवडाभर धुमाकूळ घातल्यानंतर आता विश्रांती घेतली आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता कमीच आहे. शुक्रवारी राज्यात कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट अथवा रेड अलर्ट देण्यात आला नाही. शुक्रवारपासून विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नगपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. उर्वरित राज्यात शुक्रवारी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर आणि पुण्यासह इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारी दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक भागांमध्ये हलका पाऊस आणि तुरळक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तराखंडमध्ये मान्सूनचा पाऊस सुरूच आहे. हवामान विभागाने शुक्रवारी उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याशिवाय हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. पूर्व उत्तर प्रदेशात १३ जुलैपर्यंत सर्वत्र पाऊस पडेल, तर उद्या काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमध्येही पावसाचा इशारा
हवामान विभागाने १० ते १३ जुलै दरम्यान हरियाणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शुक्रवारी पूर्व राजस्थानच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट पावसाची शक्यतावर्तवली आहे. त्याशिवाय, पंजाब आणि चंदीगडमध्ये १३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये हवामान कसे असेल?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, उद्या पूर्व मध्य प्रदेशात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस १५ जुलैपर्यंत सुरू राहील. छत्तीसगडमधील अनेक जिल्ह्यांमध्येही उद्या पाऊस पडेल, मात्र यासाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १० जुलै रोजी उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. बिहारमध्ये १२ जुलैपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने उद्या अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. उद्या आसाम आणि मेघालयातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.