

हैदराबादमध्ये भरधाव Aston Martin कारने धडक दिल्याने 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी राज्यसभा खासदार लिंगमानेनी रमेश यांचा 21 वर्षीय मुलगा लिंगमानेनी संजुष याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजुष हा कार चालवत होता आणि त्याने भरधाव तसंच निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा आरोप आहे.
मृत्यू झालेल्या भारती मुखी या इनऑर्बिट मॉलमधील लाइफस्टाइल कपड्यांच्या दुकानात काम करत होत्या. 16 ऑगस्ट रोजी माधापूर परिसरात कामाच्या ठिकाणाजवळ रस्ता ओलांडताना त्यांना या कारने धडक दिली.
सायबराबाद पोलिसांनी तपास केल्यानंतर कार चालवणारा संजुष असल्याचं समोर आलं. त्याचे वडील लिंगमानेनी रमेश हे व्यावसायिक असून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाचे राज्यसभा खासदार आहेत. संजुषला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
माधापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त सी. श्रीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलीये. या प्रकरणातील गुन्हा जामीनपात्र आहे. तसंच या गुन्ह्यासाठी सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. दरम्यान संजुषला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितलंय.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, भारती आणि त्यांची सहकारी पूजा अशोक अलोने या दोघी रविवारी दुपारी तीनच्या सुमारास जेवणासाठी जवळच्या आयटीसी कोहिनूर परिसरात गेल्या होत्या. जेवण करून त्या पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतत होत्या.
भारती इनऑर्बिट मॉलसमोरून रस्ता ओलांडत असताना TG-09-G-0666 क्रमांकाच्या Aston Martin कारने त्यांना धडक दिली. कार भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवली जात असल्याने हा अपघात झाल्याचं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलंय.
या धडकेत भारती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना त्याच कारमधून जुबली हिल्सच्या अपोलो रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर भारती यांच्यासोबत असलेल्या पूजा यांनी दुकानाचे व्यवस्थापक अश्विन कुमार यांना घटनेची माहिती दिली. अश्विन कुमार यांनी पोलिसांना याबाबत कळवलं.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम एखाद्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे केलेल्या कृत्यामुळे मृत्यू झाल्यास लागू होते. मात्र हे कृत्य सदोष मनुष्यवधाच्या श्रेणीत येत नसावं अशी या कलमाची तरतूद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.