

saptrang@esakal.com
एपस्टीन फाइल्स प्रकरणात अडकलेल्या अब्जाधीशांच्या मागे लागण्याऐवजी शोधपत्रकार जुली ब्राउनने ‘जेन डोज’चा, म्हणजे अज्ञात पीडितांचा शोध सुरू केला. त्यांना समाजाने ‘बाल वेश्या’ म्हणून हिणवून नाकारले होते, त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. तिने ८० पीडितांची यादी तयार केली आणि ६० जणींशी संपर्क साधला. जुलीने त्यांना दिलेले आश्वासन साधे, पण क्रांतिकारी होते: ‘‘मी इथे तुमचं प्रदर्शन करायला नाही, तर व्यवस्थेचं नग्न रूप उघडं पाडायला आले आहे.’’ या प्रकरणाला चव्हाट्यावर आणणाऱ्या एका शोधपत्रकाराची ही थक्क करणारी कहाणी...
फ्लोरिडाच्या त्या उष्ण आणि दमट हवेत पसरलेला समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा गंधात, सत्तेच्या दिवाणखान्यात गाडल्या गेलेल्या सत्याचा एक उग्र दर्पही मिसळलेला असतो. झगझगत्या अमेरिकेच्या उच्च आणि घुमटाच्या गोलाकार छतांखाली काही रहस्ये आहेत, जी कायमची गाडून टाकण्यासाठीच जणू समोर आली होती. ही गोष्ट आहे अशा प्रसिद्ध कलंकित माणसांची, ज्यांच्याकडे स्वतःची खासगी विमाने होती, ज्यांच्या डायरीत जागतिक नेत्यांचे नंबर होते, न्यायाच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्याची अफाट ताकद होती आणि न्यायाच्या तराजूला झुकवण्याची अमाप पैशाची ताकदही. गेल्या दशकातील जेफ्री एपस्टीन हे असंच एक ‘मिथक’. २००८च्या एका गुळगुळीत कायदेशीर तडजोडीने अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेला एका नराधमाच्या दावणीला बांधले होते. मात्र २०१७मध्ये या व्यवस्थेला एका अशा भिंतीची धडक बसली, जिला विकत घेणे किंवा धमकावणे कोणालाही जमले नाही. ती भिंत म्हणजे ‘मायामी हेरॉल्ड या वृत्तपत्राची एक नेहमीच कर्जात बुडलेली पण जिद्दीने पेटलेली शोधपत्रकार जुली के. ब्राउन!
हा लेख केवळ एका गुन्ह्याचा उलगडा नाही, तर सत्याचा पाठलाग करणाऱ्या एका पत्रकाराच्या एकाकी आणि खडतर प्रेरणादायी प्रवासाचा लेखाजोखा आहे. जुली ब्राउनने एपस्टीनच्या २००८च्या प्रकरणाची फाइल पुन्हा उघडण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा तिला मिळालेली वागणूक थंड होती. ‘हे जुनं प्रकरण आहे,’ ‘तो तुरुंगात जाऊन आलाय,’ ‘जग पुढे गेलंय,’ अशा प्रतिक्रिया तिला ऐकायला मिळाल्या. पण जुली सवंग प्रसिद्धीसाठी धावणारी पत्रकार नव्हती. तिने फ्लोरिडाच्या तुरुंगव्यवस्थेतील अंधार जवळून पाहिला होता. तिला त्या मुलींची शांतता अस्वस्थ करत होती. ज्या माणसाने एपस्टीनला वाचवले, तो अलेक्झांडर अकोस्टा अमेरिकेचा कामगार मंत्री (लेबर सेक्रेटरी) होतो आणि ज्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले त्या मात्र अंधारातच राहतात, हा विरोधाभास तिला सहन झाला नव्हता. तिने या प्रकरणाचा तपास एखाद्या ‘कोल्ड केस’सारखा सुरू केला. तिने अब्जाधीशांच्या मागे लागण्याऐवजी त्या ‘जेन डोज’चा म्हणजे अज्ञात पीडितांचा शोध सुरू केला. ज्यांना समाजाने ‘बाल वेश्या’ म्हणून हिणवून नाकारले होते, त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. तिने ८० पीडितांची यादी तयार केली आणि ६० जणींशी संपर्क साधला. जुलीने त्यांना दिलेले आश्वासन साधे, पण क्रांतिकारी होते: ‘‘मी इथे तुमचं प्रदर्शन करायला नाही, तर व्यवस्थेचं नग्न रूप उघडं पाडायला आले आहे.’’
हे सगळं वादळ घेऊन ती वृत्तपत्राच्या कार्यालयात पोहोचते... शोधपत्रकारिता हा एक महागडा आणि धोकादायक जुगार असतो. समोर असा माणूस होता ज्याच्याकडे नामांकित वकिलांची फौज आणि खासगी गुप्तहेर होते. याआधी अनेक मोठ्या माध्यमसमूहांनी या प्रकरणाला हात लावण्याचा प्रयत्न केला, पण एका फोन कॉलवर त्यांचे रिपोर्ट ‘रिअल इस्टेट’ विभागात बदली केले गेले. मायामी हेराल्डवरही दबाव प्रचंड होता, पण संपादक केसी फ्रँक यांनी ढाल बनून जुलीला साथ दिली. ‘‘आमचं वृत्तपत्र पैशाने किंवा वकिलांच्या धमक्यांनी दबणार नाही,’’ हा त्यांनी दिलेला शब्द म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ताकद होती. वर्षभर जुली आणि फोटोग्राफर एमली मिशोट यांनी १० हजार पानांच्या कागदपत्रांची छाननी केली. प्रत्येक शब्दासाठी त्यांना कायदेशीर लढाई लढायची तयारी ठेवावी लागली.
मात्र काय होतं हे सत्तेच्या सावलीतील एक काळोख वास्तव, ज्याचं नाव जेफ्री एपस्टीन होतं. जगभरातील अतिश्रीमंत, राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्तींच्या वर्तुळात वावरणारा एपस्टीन हा केवळ एक ‘फायनान्सर’ नव्हता, तर तो एका भयानक लैंगिक शोषणाच्या जाळ्याचा सूत्रधार होता. आज जेव्हा आपण ‘एपस्टीन फाइल्स’बद्दल बोलतोय, तेव्हा त्यातून समोर येणारी माहिती कोणत्याही थ्रिलर चित्रपटापेक्षा अधिक विदारक आणि धक्कादायक वाटते. या थ्रिलर चित्रपटाच्या नायिकेच्या भूमिकेत जाणवते ती जुली ब्राउन.
थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया... एपस्टीनने आपल्या करिअरची सुरुवात गणिताचा शिक्षक म्हणून केली, पण लवकरच त्याने वित्त क्षेत्रात प्रवेश केला. त्याच्या अफाट संपत्तीचा स्रोत नेहमीच संशयास्पद राहिला, पण त्या संपत्तीच्या जोरावर त्याने स्वतःचं एक वेगळं साम्राज्य उभं केलं. अमेरिकेतील पाम बीच आणि व्हर्जिन आयलंड्समधील त्याच्या खासगी बेटावर त्याने अल्पवयीन मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषणाचे रॅकेट चालवले. या जागेला आता ‘पेडोफाईल आयलंड’ म्हटले जाते. चित्रपटाच्या खलनायकाला सत्ता आणि व्यवसायाचं संरक्षण असतंच.. सत्तेशी असलेले लागेबांधे या प्रकरणाची सर्वांत भयानक बाजू आहे. एपस्टीनचे बड्या नेत्यांशी असलेले संबंध. बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचा प्रिन्स अँड्र्यू यांसारखी मोठी नावे या प्रकरणाशी जोडली गेली.
एपस्टीन या शक्तिशाली लोकांचे मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत असे किंवा आपल्या प्रभावाचा वापर करून स्वतःला वाचवत असे. वित्त व्यवस्थापनाच्या आणि जागतिक लागेबांधे सांभाळण्यासाठी तो या मुला-मुलींचा वापर करत असे. २००८मध्ये हे प्रकरण पहिल्यांदा बाहेर आल्यावर एका ‘स्वीटहार्ट डील’मुळे त्याला केवळ १३ महिन्यांची किरकोळ शिक्षा झाली. भ्रष्ट न्यायव्यवस्थेचा तो परिणाम होता. मात्र, २०१९मध्ये त्याला पुन्हा एकदा सेक्स ट्रॅफिकिंगच्या गंभीर आरोपांखाली अटक करण्यात आली. या खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच १० ऑगस्ट २०१९ला न्यूयॉर्कच्या तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. अधिकृतरीत्या ही ‘आत्महत्या’ सांगितली गेली असली, तरी त्याने अनेक गुपिते आपल्यासोबत नेली किंवा मारून टाकली गेली. न्यायालयाच्या आदेशानं २०२५-२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘एपस्टीन फाइल्स’मुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. लाखो पानांच्या या कागदपत्रांमध्ये जगातील अनेक दिग्गज नेत्यांची नावे समोर येत आहेत. हे प्रकरण केवळ एका गुन्हेगारापुरते मर्यादित नसून, पैसा आणि प्रभाव वापरून न्यायव्यवस्थेला कसं वाकवलं जाऊ शकतं आणि सत्य कसं गाडून टाकलं जाऊ शकतं, याचं हे एक ज्वलंत आणि दुर्दैवी उदाहरण आहे.
जुली ब्राउनच्या धाडसी पत्रकारितेनं हे प्रकरण पुन्हा जगासमोर आलं. एपस्टीन फाइल्स समोर येण्यापूर्वी, जगातील शक्तिशाली राजकारणी आणि राजपुत्रांशी संबंध असलेल्या माणसाला उघडे पाडणे हे एखाद्या ‘फॅन्टसी’सारखे वाटत होते. जुलीला धमकावले गेले, तिची कारकीर्द संपवण्याची भीती घातली गेली. एका माजी पोलिस प्रमुखाने तर तिला बजावले होते, ‘‘उद्या तुझी बदली ओबिट्युअरी म्हणजे निधन वार्ता विभागात होईल.’’ मात्र जुली थबकली नाही, मागे हटली नाही. एका सामान्य कुटुंबात वाढलेली जुली त्या पीडित मुलींमध्ये स्वतःला पाहत होती. ‘‘मी सुद्धा त्यांच्यापैकी एक असू शकले असते,’’ ही जाणीवच तिला प्रकरणाचा माग काढण्याची ऊर्जा देत होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये जेव्हा ‘Perversion of Justice’ म्हणजे ‘न्यायाची विटंबना’ ही लेखमाला प्रसिद्ध झाली, तेव्हा त्याचे हादरे मायामीपासून वॉशिंग्टन आणि लंडनपर्यंत बसले. ज्या व्यवस्थेला गेली दहा वर्षे काहीच दिसत नव्हते, तिला अचानक जाग आली. जेफ्री एपस्टीनला सुटण्यासाठी मदत करणाऱ्या अलेक्झांडर अकोस्टाला कामगार मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि जुलै २०१९मध्ये जेफ्री एपस्टीनला बेड्या ठोकल्या गेल्या. जुलीच्या आणि मायामी हेराल्डच्या लढ्याला यश मिळू लागतं, तोच जेफ्री एपस्टीनचा संशयास्पद मृत्यू होतो.
आज २०२६ मध्ये, जेव्हा एपस्टीनच्या फाइल्समधील बड्या धेंडांची नावे उजेडात येत आहेत, तेव्हा खरा विजय त्या पत्रकारितेचा आहे, जिने हे सिद्ध केले की पैसा न्यायाचे कायमस्वरूपी ‘गेट आउट ऑफ जेल’ कार्ड मिळू शकत नाही. जुली ब्राउनने केवळ एक बातमी दिली नाही, तर तिने मृत्यूशय्येवर निजवलेल्या सत्याला पुन्हा जीवदान दिलं. पैसा आणि सत्ता याच्या अभद्र युतीतून काहीही शक्य आहे, ही व्यवस्था आणि हा समज मोडून काढला.
सत्य आपोआप बाहेर येत नसतं, तर जुली ब्राउनसारख्या जिद्दी पत्रकाराला ते सत्तेच्या अंधाऱ्या विवरातून ओढून बाहेर काढावं लागतं. म्हणून आज जुली ब्राऊनला आणि तिच्या वृत्त समूहाला, संपादकाला प्रेरणास्थानी ठेवण्याची वेळ आली आहे आणि ‘थँक्यू’ म्हणण्याचीही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.