

चार सख्खे भाऊ. लोकांना त्यांच्या स्वप्नातलं घर बांधून देण्याचे काम करायचे. एरवी वेगवेगळ्या ठिकाणी कामं असायची. आज, मंगळवारी या चौघांचंही एकाच ठिकाणी काम आलं. ते कारमधून एकत्रच निघाले आणि तिथंच घात झाला. या चौघांवर काळानं झडप घातली. एका भरधाव बसने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात चौघा भावंडांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मृत्यूच्या घटनेनं अख्खं गाव हळहळलं. राजस्थानमधील बालोतरा जिल्ह्यात हा अपघात झाला.
बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी भीषण अपघात झाला. यात चार सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला. पाटोदीजवळ एका भरधाव बसने कारला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की कारचा चक्काचूर झाला. त्यात प्रवास करणाऱ्या चार भावंडांचा मृत्यू झाला. एकाच घरातील चार भावंडांच्या अपघाती मृत्यूनं परिसरावर शोककळा पसरली. कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी संबंधित बसचालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
उदाराम (वय ३९), रेखाराम (वय ३५), जोगाराम (वय ३१) आणि विशनाराम (वय २९) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे चौघेही कोडुका गावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, चौघे भाऊ घरे बांधण्याचे काम करत होते. एरवी त्या चौघांचीही कामे वेगवेगळ्या ठिकाणी असायची. मंगळवारी एकाच ठिकाणी त्यांचे काम होते. त्यामुळे ते एकत्रच कारमधून कालेवा गावी जात होते. पाटोदी गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव बसने त्यांच्या कारला धडक दिली.
या धडकेत कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पचपदरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढले. ते जिल्हा रुग्णालयात पाठवले. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला. अपघातानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला. गावकरी आणि कुटुंबीयांनी पाटोदी रस्त्यावर ठिय्या मांडला. बसचालकाला अटक करावी आणि मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
चौघा भावंडांच्या मृत्यूनं कुटुंबीयांचा आधारच हिरावला आहे. वृद्ध आई-वडील, पत्नी आणि मुले या कुटुंबात आहेत. जोगाराम हा अविवाहित होता. एकाच कुटुंबातील चार मुलांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने अख्खं गाव हळहळलं. दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून, नेमका अपघात कसा झाला? याचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.