

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांआधी ईडीच्या कारवाईनं मोठी खळबळ उडाली. अंमलबजावणी संचालनालयानं (ED) माजी शिक्षण मंत्र्यांच्या घरावर छापेमारी केली. कथित शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईडीकडून अशा प्रकारच्या झालेल्या कारवाईनं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने शनिवारी दक्षिण कोलकाताच्या नकटला स्थित पार्थ चॅटर्जी यांच्या निवासस्थानी छापा मारला. घराची झाडाझडची सुरू असतानाच बाहेर पथकातील अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचा लवाजमा होता. पार्थ चॅटर्जी यांची ईडीला पुन्हा चौकशी करायची असल्यानं ही कारवाई केल्याचे सांगितले जाते. कारण चॅटर्जी हे याआधी अनेकदा समन्स बजावूनही हजर झाले नव्हते.
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात अनेक प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ चॅटर्जी यांना या प्रकरणात अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आजारी असल्याचे कारण देत त्यांनी हजर राहणे टाळल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच ईडीने त्यांच्या घरी छापेमारी केल्याचे बोलले जात आहे.
ईडीचे एक पथक न्यू टाउन येथील प्रसन्ना रॉय यांच्या कार्यालयावरही धडकले. रॉय हे या प्रकरणात आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. भरती प्रक्रियेत कोणकोणत्या प्रकारे अनियमितता झाली आहे, याचा तपास ईडी वेगाने करत आहे. सन २०२२ मध्ये शिक्षक भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. ईडीने पार्थ चॅटर्जी यांना अटक केली होती. त्याचवेळी त्यांचे निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातूनही कोट्यवधींची रोकड जप्त केली होती.
न्यायालयाने या प्रकरणात अर्पिता मुखर्जी यांना जामीन मंजूर केला होता. तर पार्थ चॅटर्जी यांना सप्टेंबरमध्ये हायकोर्टातून जामीन मिळाला होता. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे नोव्हेंबरमध्ये त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली होती. आता या शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अचानक ईडीने पुन्हा पार्थ चॅटर्जी यांच्या घरावर धाड टाकल्याने पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हा राजकीय कट असल्याचे राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून बोलले जात आहे. या प्रकरणात आणखी काही गंभीर गोष्टी उजेडात येऊ शकतात, असे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.