

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ कार बॉम्बस्फोट
११ जणांचा जागीच मृत्यू
डॉ. मोहम्मदच्या २ भावांना अटक
ठिकाण दिल्लीतील लाल किल्ला. गजबजलेला परिसर. लोकांची रेलचेल. सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांपूर्वी एक कार आली अन् क्षणात बॉम्बस्फोट झाला. जीवाच्या आकांताने लोकांची धावाधाव. पण काही जण बॉम्बस्फोटाच्या कचाट्यात सापडले. ११ जणांचा जागीच मृत्यू. तर, अनेक जण जखमी झाले. या बॉम्ब स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला. या भीषण बॉम्बस्फोटामागचा मास्टरमाईंड कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, डॉक्टर उमर मोहम्मदला या प्लॅनमागचा मास्टरमाईंड मानला जात आहे. याने दिल्लीत स्फोट घडवून आणल्याचं बोललं जात आहे. आता त्याचा पहिला फोटो प्रसारमाध्यमांच्या हाती आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांनी मोहम्मदच्या दोन भावांना पुलवामा येथून अटक केली आहे.
उमर मोहम्मद नक्की आहे तरी कोण?
एनडीटिव्हीच्या रिपोर्टनुसार, डॉक्टर मोहम्मद हा मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होता. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद डॉ. आदिल अहमद राथर आणि डॉ. मुजम्मिल शकील यांचा जवळचा साथीदार होता. या दोघांना हरियाणा आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलअंतर्गत अटक केलीये. या दोघांना ताब्यात घेताच उमर फरार झाला.
प्राथमिक माहितीनुसार, कारवाई होणार या भीतीनं त्यांनी कारमध्ये डेटोनेटर बसवलं अन् बॉम्बस्फोट घडवून आणला. त्याने हा संपूर्ण कट २ साथीदारांच्या मदतीने घडवून आणला. या स्फोटात तो गाडीत होता. ते सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, या स्फोटात त्यानं स्वत:लाही उडवून घेतलं असल्याचं बोललं जात आहे.
घटनेच्या दिवशी पांढऱ्या रंगाची चारचाकी ३ वाजून १९ मिनिटांनी लाल किल्ल्या पार्किंग परिसरात गेली. ३ तास ही कार त्याच परिसरात उभी होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कार बाहेर पडली. नंतर ६ वाजून ५२ मिनिटांनी कारचा भीषण स्फोट झाला. ११ जणांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, पोलिसांनी उमरच्या दोन सख्ख्या भावांना पुलवामा येथून अटक केलीये. या प्रकरणात सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागचं कारण काय? याचा तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.