

गोवा काँग्रेसच्या १०८ BLA-2 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का
गोवा काँग्रेसमध्ये १०८ बूथ लेव्हल एजंट्सनी दिले राजीनामे
काँग्रेसच्या नेत्यांमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलीय. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गोवा दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या आधीच गोवा काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. काँग्रेसच्या सुमारे १०८ बूथ लेव्हल एजंट्स (BLA-2) यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आलीय. काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनामा पत्रांच्या प्रतीही सार्वजनिक केल्या आहेत.
बूथ पातळीवरील कार्यकर्ते हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या संघटनेचा महत्त्वाचा आधार असतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने BLA-2 पदाधिकाऱ्यांनीच राजीनामे दिल्याने काँग्रेसच्या संघटनात्मक व्यवस्था कोलमडली असल्याची गंभीर बाब समोर आलीय.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा दौऱ्यात बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर दिला जाणार असताना, त्याच काळात बूथ पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व तळागाळातील कार्यकर्त्यांच्या नाराजीची दखल घेणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान पक्षाकडून सातत्याने बूथ पातळीवरील संघटना मजबूत करण्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात बूथ पातळीवरील पदाधिकारीच राजीनामा देत असतील, तर पक्षाच्या संघटनात्मक धोरणाचा आढावा घेण्याची गरज निर्माण झालीय.
पक्षातील बैठका, संघटनात्मक निर्णय आणि निवडणूक नियोजनामध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांना किती स्थान दिले जाते, यावरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. काही कार्यकर्त्यांकडून पक्षातील निर्णयप्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली जातेय. महत्त्वाचे निर्णय काही मोजक्या नेत्यांच्या प्रभावाखाली घेतले जात असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांवर गोवा काँग्रेस नेतृत्वाने स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे.
काही संघटनात्मक घडामोडींमुळेही नाराजीची चर्चा सुरू आहे. अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वाशीम खान, सोशल मीडिया विभागाशी संबंधित पदाधिकारी आणि इतर काही कार्यकर्त्यांवर पक्षाने केलेल्या कारवाईमुळे पक्षांतर्गत मतभेद तीव्र झाल्याचं सांगितलं जातंय.
काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू असताना, त्याचवेळी बूथ पातळीवरील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिलेत. मोठ्या नेत्यांचे दौरे आणि बैठका यापेक्षा तळागाळातील कार्यकर्त्यांचा विश्वास मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने या राजीनाम्यांची कारणे गांभीर्याने तपासत कार्यकर्त्याशी संवाद साधण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.