

कोलंबियाला सोमवारी सकाळी 7.4 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा मोठा धक्का बसला. या भूकंपामुळे देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून मृतांचा आकडा 77 वरून वाढून 111 वर पोहोचला आहे. अनेक इमारती कोसळल्या असून काही ठिकाणी लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे.
अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, हा भूकंप 12:34 यूटीसीला म्हणजेच स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे 7:34 वाजता झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू कोलंबियातील चोको विभागात सैन जोस डेल पालमारपासून सुमारे 5 किलोमीटर पूर्वेला होता. जमिनीपासून सुमारे 107 किलोमीटर खोलीवर भूकंप झाला.
पेरेराच्या महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे शहरात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मनिजालेसच्या महापौरांनी बीएलयू रेडिओशी बोलताना शहरात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
भूकंपाचे जोरदार धक्के कोलंबियातील अनेक भागांमध्ये जाणवले. शेजारील वेनेजुएलामध्येही काही भागांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. मात्र, भूकंपानंतर अमेरिकन सुनामी वॉर्निंग सिस्टीमने कोणत्याही सुनामीचा इशारा दिलेला नाही.
भूकंपानंतर काही वेळातच त्यातून झालेल्या नुकसानीचं चित्र स्पष्ट होऊ लागलं. कैलीचे महापौर अलेजांद्रो एदेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात किमान 20 इमारती कोसळल्या आहेत. काही इमारतींच्या ढिगाऱ्याखाली नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे.
घटनास्थळी मदत आणि बचाव पथकं पोहोचली असून नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. बोगोटा आणि मेडेलिनच्या महापौरांकडेही अतिरिक्त बचाव पथकं पाठवण्याची विनंती करण्यात आलीये.
अलेजांद्रो एदेर यांनी नागरिकांना घाबरून न जाता शांत राहण्याचं आवाहन केलंय. त्याचप्रमाणे घर किंवा इमारतीमध्ये भूकंपामुळे काही नुकसान झालं आहे का याची काळजीपूर्वक तपासणी करण्यास सांगितलंय. इमारतीत मोठ्या भेगा पडल्या असतील किंवा तिथे राहणं सुरक्षित वाटत नसेल तर नागरिकांनी तातडीने इमारतीबाहेर पडावं, असंही त्यांनी सांगितलंय.
चोकोच्या गव्हर्नर नूबिया कॅरोलिना कोरदोबा-कुरी यांनी सांगितलं की, क्विब्दो शहरात भूकंपामुळे अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालंय. या घटनेत काही नागरिक जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. भूकंपानंतर आणखी हादरे म्हणजेच आफ्टरशॉक्स येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाची चिंता वाढलीये. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मोठ्या भूकंपाचा परिणाम कोलंबियातील हवाई वाहतुकीवरही झाला. विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरेरा, मनिजालेस, क्विब्दो, आर्मेनिया, कार्टागो आणि बुएनावेंतुरा या ठिकाणच्या विमानतळांचं नुकसान झालंय.
विमानतळांची तसंच विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षेची तपासणी करण्यासाठी काही काळ उड्डाणं थांबवण्यात आली. विमानतळांची स्थिती तपासल्यानंतरच पुढील उड्डाणांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कोलंबियाची नॅशनल युनिट फॉर डिजास्टर रिस्क मॅनेजमेंट ही संस्था स्थानिक प्रशासनासोबत मिळून भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करतेय.
दरम्यान राजधानी बोगोटामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही, असं शहराचे महापौर कार्लोस गालान यांनी सांगितले.
कोलंबियातील या भूकंपाचे हादरे शेजारील वेनेजुएलामध्येही जाणवले. विशेषतः सीमेवरील भागांमध्ये नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. ताचिरा आणि बारकिसिमेतो या भागातील नागरिकांनी भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती दिली.
कोलंबिया हा दक्षिण अमेरिकेतील भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील देश मानला जातो. देशाच्या आसपास अनेक टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमा आणि फॉल्ट रिजन आहेत. कोलंबियाच्या भूवैज्ञानिक सेवेनुसार, देशात आतापर्यंत 100 पेक्षा जास्त भूकंपांची नोंद झालीये. त्यामुळे सोमवारी झालेल्या 7.4 तीव्रतेच्या भूकंपानंतर प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्याला वेग देण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.