

जंतर मंतरवर सीजेपीच्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात
आशुतोष रांका, अजिंक्य शिंदे आणि सौरव दास यांच्यावर पोलिसांची कारवाई
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजेपीचे आंदोलन
अभिजीत दीपके आज दिल्लीत परत येणार
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी आज पुन्हा एकदा सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे या तिघांना जंतर मंतर येथून ताब्यात घेतले. बंदी असूनही रांका, दास आणि शिंदे हे तिघेही जंतर-मंतर येथे आले त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. या तिघांना पोलिसांनी कुठे नेले आहे, हे अद्याप कळलेले नाही.
१० ऑक्टोबर रोजी जंतर मंतर मैदानावरील आंदोलनापूर्वी दिल्ली विमानतळावरून अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी अटक केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून त्या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते जिथे ५०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला होता. एक वर्षासाठी कोणत्याही शांततेचा भंग करणाऱ्या कार्यात सहभागी न होण्याच्या आणि चांगले वर्तन ठेवण्याच्या अटीवर त्यांना जामीन देण्यात आला होता.
सीजेपीच्या तिन्ही नेत्यांची सुटका झाल्यानंतर ते पुन्हा आक्रमक झाले. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावर ठाम असून आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सांगितले होते. अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे ते हिंगोलीला गेले. तर रांका आणि दास यांनी आंदोलन सुरू ठेवले. आज सीजेपीचे नेते रांका, दास आणि शिंदे हे पुन्हा जंतर मंतरवर आंदोलनासाठी गेले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दिल्ली पोलिसांनी राजधानीतील आंदोलने आणि निदर्शनांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांच्या यादीतून जंतर मंतर वगळले आहे. दिल्ली पोलिस आयुक्त अनुराग कुमार यांनी ११ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या कायमस्वरूपी आदेशानुसार, जंतर मंतरवर यापुढे निदर्शनांना परवानगी दिली जाणार नाही. रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट मैदान ही आंदोलनांसाठी नवीन ठिकाणे असणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.