

होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका-इराण तणाव तीव्र
चीनने अमेरिकेला दिला थेट इशारा
लष्करी तैनातीमुळे परिस्थिती गंभीर
मध्य-पूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. कारण होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता वाढला आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या बंदरांना वेढा घालण्याचे आदेश दिल्यानंतर चीन संतप्त झाला आहे. घोषणेनुसार, अमेरिकेने काल होर्मुझची सामुद्रधुनी नाकेबंदी केली आहे.
इराणच्या बंदरांना नाकेबंदी करण्यासाठी, घातक एफ-३५बी लाइटनिंग II स्टेल्थ फायटर आणि एमव्ही-२२ ऑस्प्रे विमानांनी सुसज्ज असलेली १५ हून अधिक अमेरिकी युद्धनौका तैनात केल्या आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीमुळे चीन संतप्त झाला असून त्याने अमेरिकेला थेट धमकी दिली आहे. यामुळे होर्मुझवरून सुरू झालेला हा वाद आता अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधील थेट संघर्षात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेनं नाकेबंदी केल्यामुळे चिनी जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनीतून परत जावे लागले. यामुळे चीन संतप्त झाला असून चीनने अमेरिकेला इशारा दिला की, अमेरिकेने त्याच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणेच योग्य राहील. जर अमेरिका त्याच्या मार्गात अडथळा बनला नाही, तर स्थिरता आणि शांतता टिकून राहील. चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटलंय की, चीनला मध्य पूर्वेत शांतता आणि स्थैर्य हवे आहे, परंतु तो इराणसोबतच्या आपल्या ऊर्जा आणि व्यापारी करारांचा आदर करेल.
होर्मुझवर इराणचे नियंत्रण आहे आणि हा जलमार्ग चीनच्या जहाजांसाठी खुलाच राहील. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणत्याही बाहेरच्या देशाचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप स्वीकारणार नसल्याचं चीनने आपल्या निवदेनात म्हटलंय.
स्पेनच्या संरक्षण मंत्री, मार्गारीटा रोब्लेस यांनी नाकेबंदीची धमकी "निरर्थक" म्हटली आहे. या संघर्षामुळे जग आधीच एका धोकादायक परिस्थितीत येऊन पोहोचले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले की, नाकेबंदीत सामील होण्यासाठी त्यांना कोणतीही विनंती आलेली नाही आणि जलमार्ग सर्व देशांसाठी खुला राहिला पाहिजे.
चीन आपल्या गरजेच्या ४० टक्के कच्चे तेल याच मार्गावरून आणतो. चीनच्या ३० टक्के एलएनजी गरजा याच जलमार्गावर अवलंबून आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. दरम्यान पाकिस्तानमध्ये इराणसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्व बंदरांना लक्ष्य करण्याचे आदेश दिलेत. अमेरिकन सेंट्रल कमांडनुसार, इराणमध्ये येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर कडक नजर ठेवली जाणार आहे.
अमेरिका-इराण चर्चा फिसकटल्यानंतर आणि अमेरिकेच्या नाकेबंदी करण्याच्या घोषणेनंतर तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल १०१.८८ डॉलर आणि यूएस क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल १०४.६९ डॉलरपर्यंत वाढली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील संभाव्य तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.