फ्रान्समध्ये विमानाचा भीषण अपघात
विमानातील ११ जणांचा मृत्यू
उड्डाणानंतर काही क्षणांत विमान कोसळलं
France Plane Crash 11 Dead Update News फ्रान्समधून मोठी बातमी समोर आली आहे. पूर्व फ्रान्समधील टॉम्ब्लेन येथे रविवारी सकाळी एक भीषण विमान अपघात घडला. पॅराशूट प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे एक विमान उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळल्याने विमानातील सर्व ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत पाच विद्यार्थी, पाच ट्रेनर आणि पायलटचा समावेश असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, नॅन्सी-एसे विमानतळावरून रविवारी सकाळी सुमारे ११ वाजता या विमानाने उड्डाण केले होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेले आणि धावपट्टीजवळील गवताळ भागात कोसळले.
मर्थ-ए-मोझेल विभागाचे प्रीफेक्ट इव्ह सेगुई यांनी सांगितले की, अपघातापूर्वी विमानात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर विमान सरळ खाली झेपावले. अपघात इतका भीषण होता की विमानातील कोणालाही जीव वाचवण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे हे विमान एका शॉपिंग सेंटरच्या अगदी जवळ कोसळले. अधिकाऱ्यांच्या मते, विमान काही मीटर पुढे कोसळले असते तर जमिनीवरील अनेक नागरिकांच्याही जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, वैद्यकीय पथके आणि इतर आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. स्फोटाचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला. दरम्यान, फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशाचे गृहमंत्री घटनास्थळी रवाना झाल्याचे मंत्रालयाने सांगितले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.