बिहारच्या बेतिया जिल्ह्यात ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमादरम्यान भीषण बस अपघात
गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकला वाचवताना भरधाव बसचा ताबा सुटला
५ जणांचा जागीच मृत्यू
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण
बिहारमधील बेतिया जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा भीषण रस्ता अपघात झाला. लौरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पराउ टोला बनकटवा गावाजवळ हा अपघात घडला. भरधाव वेगातील बस ट्रकला धडकण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात घुसली. या दुर्घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ६ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेतिया-लौरिया मुख्य मार्गावर पराउ टोला बनकटवा गावाजवळ एका कार्यक्रमानिमित्त ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. रात्री कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. त्याचवेळी लौरियाच्या दिशेने बेतियाकडे जाणारी बस भरधाव वेगाने येत होती.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, समोरून गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक येत होता. ट्रकशी धडक टाळण्यासाठी बसचालकाने अचानक बस वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याच्या कडेला कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांच्या गर्दीत घुसली. अचानक बस घुसल्याने घटनास्थळी एकच आरडाओरड आणि गोंधळ उडाला.
या अपघातात संजय महतो, भोला दुबे, बहादुर महतो, देवेंद्र दुबे आणि छांगुर राम यांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, ज्या कुटुंबाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यांच्याच कुटुंबातील कर्त्याव्यक्तीचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यामुळे अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांवर मोठे दुःख कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या ५ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या भीषण दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.