RCB event manager Nikhil Sosale arrested in Bengaluru stampede : चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरा प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ११ जणांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी पहिली अटक केली आहे. स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) चा इव्हेंट मॅनेजर निखिल सोसले याला विमानतळावर अटक केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. या प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार आहे.
पंजाबचा पराभव करत आयपीएल २०२५ च्या चषकावर आरसीबीने नाव कोरले होते. पहिल्यांदाच आयपीएल चषक जिंकल्यानंतर आरसीबीच्या विजयोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली. बुधवारी चिन्नास्वामी स्टेजियमवर लाखो लोक जमले होते, त्यावेळी चेंगराचेंगरी झाली अन् ११ जणांचा बळी गेला. ६० जण या दुर्घटनेत जखमी झाले. या प्रकरणाने देशात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला, कर्नाटकच्या मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पहिली अटक करण्यात आली. आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसले याला बेंगलुरू विमानतळावरून अटक करण्यात आली. याशिवाय आणखी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्वांची कब्बन पोलिस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कब्बन पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये आरसीबीला आरोपी क्रमांक १, डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडला आरोपी क्रमांक २ आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या प्रशासकीय समितीला आरोपी क्रमांक ३ ठरवण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आवश्यक परवानगी न घेतल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. आरसीबी, डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने परवानगीशिवाय विजयोत्सव साजरा केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. आरसीबीने या प्रकरणी कायदेशीर कारवाईत सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी या प्रकरणी कठोर पावले उचलत बेंगळुरूचे पोलिस आयुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त, कब्बन पार्क ठाण्याचे प्रभारी, सहायक पोलिस आयुक्त, मध्यवर्ती विभागाचे उपायुक्त, क्रिकेट स्टेडियम प्रभारी, स्टेशन हाउस मास्टर आणि स्टेशन हाउस ऑफिसर यांच्यासह ८ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मायकेल डी’कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. हा आयोग ३० दिवसांत आपला अहवाल सादर करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.