ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयपीएलच्या १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्यांदाच विजेतेपद जिंकले. बुधवारी संघ अहमदाबादवरुन बंगळुरुला पोहोचला तेव्हा चाहते संघाची एक झलक पाहण्यासाठी उस्तुक होते.
आरसीबी संघ बंगळुरुमध्ये विधान भवन ते चिन्नास्वामी स्टेडियम पर्यंत विजयी रॅली करणार होता. परंतु,आरसीबीच्या सत्कार समारंभादरम्यान स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ११ जणांचा मत्यू झाला. मीडिया वृत्तानुसार, गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.
याशिवाय या दुर्घटनेत २५ पेक्षाही अधिक लोक गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे आरसाीबी चॅम्पियन झाल्याचा आनंद दुःखात बदलला. माहितीनुसार, ३५,००० ची क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये २ ते ३ लाख चाहते पोहोचले. चेंगराचेंगरीची दुःखद घटना घडली तेव्हा स्टेडियमच्या आत असलेल्या लोकांपेक्षा जास्त लोक बाहेर होते.
या संपूर्ण दुःखद घटनेवर आरसीबी संघाने तसेच विराट कोहली,अनुष्का शर्मा आणि संघाच्या बाकी खेळाडूंनी शोक व्यक्त केले. यानंतर, घटनेची माहिती मिळताच संघाने विजयी रॅली रद्द केली.
आरसीबीने शोक व्यक्त करत ११ जणांच्या कुटुंबासाठी १० लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. निवेदनात लिहिले की, 'काल बंगळुरूमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने आरसीबी कुटुंबाला खूप वेदना झाल्या आहेत. आदर आणि एकतेचे प्रतीक म्हणून, आरसीबीने मृतांच्या अकरा कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे'.
याशिवाय, 'या दुःखद घटनेत जखमी झालेल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी आरसीबी केअर्स नावाचा निधी देखील तयार केला जात आहे. आमचे चाहते नेहमीच आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असतील. आम्ही दुःखात एकजूट आहोत.'
याआधी काल, कर्नाटक सरकारने मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबासाठी १० लाखांची मदत जाहीर केली. तसेच जखमीवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली.