अयोध्येतील राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणात मोठी अपडेट
चोरीची रक्कम शेअर बाजारात गुंतवल्याचा संशय
तपास यंत्रणांनी आतापर्यंत ३० बँक खाती गोठवली
पुढील तपास सुरु
Ayodhya Ram Mandir Donation Stolen Update अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील चोरी प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे समोर येत आहे. चोरीची रक्कम शेअर बाजारात गुंतवल्याचा पोलीस तपासात समोर आले आहे. तपास यंत्रणा आता या प्रकरणातील पैशांचा शोध घेत असून आरोपींच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांपासून ते ट्रेडिंग रेकॉर्ड्सपर्यंत सर्व बाबींची कसून चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील चोरी प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ३० खाती गोठवली आहेत. तपास यंत्रणेच्या संशयानुसार, आरोपींनी चोरीची रक्कम थेट गुंतवणुकीसाठी वापरण्याऐवजी प्रथम ती नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये जमा केली. त्यानंतर विविध खात्यांमधून व्यवहार करून हा पैसा शेअर बाजार आणि इतर गुंतवणूक पर्यायांकडे वळवण्यात आला.
या प्रक्रियेमुळे पैशांचा मूळ मालक लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. आरोपींनी एकाच वेळी मोठी रक्कम चोरली नसून, गेल्या अनेक महिन्यांपासून दान मोजणी प्रक्रियेतील त्रुटींचा फायदा घेत टप्प्याटप्प्याने रक्कम बाजूला काढल्याचा संशय आहे.
प्रत्येक वेळी कमी रक्कम काढल्यामुळे हा प्रकार बराच काळ उघडकीस आला नाही. दरम्यान, दान मोजणीदरम्यान काही कर्मचाऱ्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे प्रशासन सतर्क झाले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आणि त्यातून महत्त्वाचे पुरावे समोर आले. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत पुढील तपास सुरु केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.