पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांताच्या मकरान कोस्टल महामार्गावर प्रवासी बस आणि एलपीजी (LPG) गॅस टँकरची भीषण धडक झाली. या अपघातात १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर २७ प्रवासी जखमी झाले आहेत. भीषण धडकेनंतर बस आणि टँकरने पेट घेतला. आग लागली त्यावेळी बसमध्ये अनेक प्रवासी अडकून पडले अन् १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
डॉनच्या वृत्तानुसार, हा अपघात गुरुवारी सकाळी १०:३० च्या सुमारास ग्वादर जिल्ह्यातील ओरमारा भागातील बसोलजवळच्या कोस्टल हायवे पोलीस चौकीजवळ घडला. तुरबतहून कराचीकडे जाणारी एक खासगी प्रवासी बस आणि कराचीहून ग्वादरजवळ इराण-गाबाद सीमेकडे जाणाऱ्या समोरून येणाऱ्या एलपीजी गॅस टँकरची धडक झाली. त्यानंतर दोन्ही वाहनाने पेट घेतला अन् आगीच्या ज्वाळा उडाल्या.
बसमध्ये महिला आणि मुलांसह ४० पेक्षा जास्त जण प्रवास करत होते. त्यापैकी बरेच जण आगीच्या ज्वाळांमध्ये अडकले. ओरमाराचे डीएसपी नबी बख्श रुंझा यांच्या म्हणण्यानुसार, महिला आणि मुलांसह सर्व १० बळींचा गंभीररित्या भाजल्यामुळे मृत्यू झाला. प्रवासी बसमधून आठ आणि गॅस टँकरमधून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पाकिस्तान लष्कर, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी संयुक्तपणे आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या वाहतूक सुरळीत झाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.