Maharashtra Drought News Today : राज्यातील दुष्काळग्रस्त आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भागांतील अनावश्यक कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजन विभागाने मोठा चाप लावला आहे. ज्या कामांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, अशा सर्व कामांना तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील घोषित ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाई निवारणाच्या कामांना वेग देण्यासाठी आणि निधीचे योग्य नियोजन करण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी नवा शासन निर्णय जारी केला आहे.
'या' कामांना बसणार ब्रेक
शासन निर्णयानुसार, टंचाईग्रस्त भागांत सध्या अत्यावश्यक नसलेली नवीन उद्याने आणि सुशोभीकरणाची कामे थांबवण्यात आली आहेत. यासोबतच पाण्याचा मोठा वापर लागणारे सिमेंट रस्ते, गटार, नवीन नाले आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामांनाही स्थगिती देण्यात आली आहे. सक्षम प्राधिकरणाची रीतसर परवानगी घेऊन ही सर्व कामे तातडीने थांबवण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले आहेत.
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य
दुष्काळी भागातील अनावश्यक खर्च आणि पाण्याचा अपव्यय टाळून टंचाईग्रस्त गावांच्या पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. यामध्ये अपूर्ण जलवाहिन्या, आवश्यक पंप, वीज जोडण्या आणि पाण्याच्या साठवण टाक्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. ३१ मार्च २०२७ पूर्वी पूर्ण होऊ शकणाऱ्या योजनांना प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय सांडपाण्याचा पुनर्वापर, एसटीपी (STP) प्रकल्प उभारणी आणि जलप्रदूषण रोखणारे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे उद्दिष्टही सरकारने निश्चित केले आहे.
कोणत्या कामांना मिळणार प्राधान्य?
टंचाईग्रस्त गावांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी अपूर्ण जलवाहिन्या, पंप, विद्युत जोडण्या, साठवण टाक्या आणि वितरण यंत्रणा पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच नादुरुस्त घटकांची दुरुस्ती करून पाणी गळती रोखणे, ३०४ दुष्काळी तालुक्यांतील सुरू पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, ३१ मार्च २०२७ पूर्वी पूर्ण होणाऱ्या सांडपाणी पुनर्वापर, एसटीपी/डब्ल्यूटीपी, सौर ऊर्जा व स्वच्छतेशी संबंधित कामे, जलसंधारण, पशुधनासाठी पाणी-चारा आणि सार्वजनिक आरोग्याच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
कोणत्या कामांना स्थगिती?
दुष्काळ घोषणा लागू असेपर्यंत अत्यावश्यक नसलेली नवीन उद्याने व सुशोभीकरणाची कामे, नवीन कार्यालयीन/प्रशासकीय इमारतींचे बांधकाम, ग्रामीण व जिल्हा मार्गातील सिमेंट रस्ते, जन सुविधा/मोठ्या ग्रामपंचायत योजनेतील सिमेंट रस्ते व गटार, तसेच नवीन नाले/गटार यांसारख्या कामांचा आढावा घेऊन सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने त्यांना तात्पुरती स्थगिती दिली जाणार आहे. मात्र पिण्याच्या पाण्याशी थेट संबंधित कामे, जलस्रोत बळकटीकरण, पशुधनाचे पाणी-चारा, लघुसिंचन, सार्वजनिक आरोग्य/सुरक्षा आणि आपत्कालीन कामे या स्थगितीतून अपवाद ठेवण्यात आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.