Uddhav Thackeray Shivaji Park speech : आज कोणतीही निवडणूक जिंकलो नसलो, तरीही अंधभक्तांच्या विरोधात देशभक्तांचा विजय झाला आहे. ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे, असा घणाघाती हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेतून केला. देशातील जात, पात आणि धर्म विसरून 'भारतीय' आणि 'देशभक्त' म्हणून एकत्र आलेल्या जनतेचे औचित्य साधत त्यांनी सर्वांचे जाहीर आभार मानले. मुंबईतील शिवाजी पार्कात हजारोंच्या संख्येत तरूणाई सामील झाली. ठाकरेंच्या तिरंगा रॅलीत जिकडे पाहावे तिकडे नागरिक, तरूण दिसत होते. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनाचे रूपांतर विजयी ऱॅलीत झाले.
'एका झुरळाने हुकूमशहाला नमवले'
उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर अत्यंत शेलक्या अन् आक्रमक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, "एका झुरळाने हुकूमशहाला नमवले आहे. हाच खरा विष्णूचा अवतार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता तरी राजकारणातून वेळ काढून देशाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. तुमचे मंत्री स्वतःचे काम सोडून फक्त इतर पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. त्यांना आता तरी काहीतरी काम करायला सांगा," असा टोला त्यांनी लगावला.
केंद्रीय मंत्र्यांच्या कारभारावर सडकून टीका
उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारमधील प्रमुख मंत्र्यांच्या कामगिरीवर थेट ताशेरे ओढले. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन घसरणारा रुपया किंवा वाढत्या महागाईवर अवाक्षर काढत नाहीत, पण पेपरफुटीचे काय फायदे आहेत हे मात्र आवर्जून सांगत सुटतात. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या काळात देशाच्या सुरक्षेची बोंब झाली आहे. देश सोडून ते स्वतःच्या पक्षातील धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी धावून आले, असा टोलाही त्यांनी लगावला.
'लाडक्या धर्मेंद्रला काढताना यातना झाल्या असतील, पण...'
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत ठाकरे म्हणाले, "मोदीजी, तुम्हाला तुमच्या 'लाडक्या धर्मेंद्रला' पदावरून काढताना प्रचंड यातना झाल्या असतील. पण, या पेपरफुटीमुळे आणि गोंधळामुळे ज्या निष्पाप कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला, ज्यांनी आपल्या मुलांचा बळी दिला; त्यांना झालेल्या यातनांपेक्षा तुमच्या यातना नक्कीच मोठ्या नव्हत्या. ती दुःखे आपण कधीही विसरू शकत नाही."
'संघर्षाची ठिणगी पडली, आता वणवा पेटलाय!'
आपल्या भाषणाचा शेवट करताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला. "आता देशात संघर्षाची ठिणगी पडली असून त्याचा वणवा पेटला आहे. ही संघर्षाची नवी सुरुवात आहे. आज या संघर्षात देशवासीयांनी दाखवलेल्या एकजुटीची नोंद देशाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी केली जाईल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.