१.२८ कोटींच्या मालमत्ता कर थकबाकीमुळे कारवाई
केडीएमसीने शाळा आणि मुख्याध्यापकांचे केबिन सील केले
परीक्षा काळात झालेल्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांवर परिणाम
पालक व शिक्षकांकडून नाराजी व्यक्त
थकबाकी भरली असती तर कारवाई टळली असती, अशी चर्चा
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
राज्यात सर्वत्र १० फेब्रुवारीपासून १२वी बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. सर्वत्र परीक्षेचं वातावरण असताना केडीएमसीने टिटवाळ्यातील एका शाळा आणि कॉलेजच्या मुख्यध्यापकांचे केबिन सील केले आहे. कर थकवल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कर वसूली विभागाकडून मालमत्ता कर थकविणाऱ्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. मांडा टिटवाळा परिसरातील जी. आर. पाटील माध्यमिक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजने १ कोटी २८ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविल्याने, पालिकेच्या मालमत्ता कर वसूली विभागाने शाळेचे आणि मुख्याध्यापकांचे केबिन सील करण्याची धडक कारवाई केली . या कारवाईमुळे शाळा व्यवस्थापनाला मोठा धक्का बसला आहे. मालमत्ता कराची थकबाकी भरली जात नाही. त्यामुळे महापालिका मालमत्तांना अडकाव करते. त्या सील करते. त्यानंतर त्या मालमत्ता जप्त करुन त्याचा लिलाव करते.
महापालिकेचे कारवाई पथक शाळेत पोहचले तेव्हा शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या विश्वस्तांचे केबिन सील करा अशी विनंती केली. मात्र त्यांची विनंती डावलून महापालिकेच्या कारवाई पथकाने शाळा आणि मुख्याध्यपकांचे केबिन सील केले. महापालिकेने मुख्याध्यपकांचे केबिन सील केल्याने इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे केबिनमध्ये अडकले आहेत.
या शाळेत परिक्षेचे केंद्र आले नसले तरी, शाळेतील इतर विद्यार्थ्यांची तोंडी परिक्षा सुरु आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असल्याने किमान परिक्षा काळात ही कारवाई टाळली गेली पाहिजे होती, अशी अपेक्षा पालक,विद्यार्थी आणि शिक्षक वर्गासह व्यवस्थापनाकडून व्यक्त केली जात आहे. मात्र शाळा व्यवस्थापनानेही वेळीच मालमत्ता कराची थकबाकी भरली असती तर ही वेळ व्यवस्थापनावर आली नसती असे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.