palghar Rain Red alrt : गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत केले आहे. हवामान विभागाने (IMD) पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' जारी केला असून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
रस्त्यांवर पाणी साचले, वाहतुकीवर परिणाम
बुधवारी सायंकाळपासूनच पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ते, सखल भाग आणि बाजारपेठांमध्ये पाणी साचले असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नद्या आणि नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने किनारपट्टीच्या व सखल भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क मोडवर ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून पालघरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ. इंदू राणी जाखड यांनी गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी डहाणू उपविभागातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबई आणि उपनगरांतही पावसाचा जोर कायम
दुसरीकडे, मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्येही रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. दक्षिण मुंबईसह अंधेरी, बोरिवली, ठाणे आणि नवी मुंबई भागात मुसळधार सरी कोसळल्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे सकाळी नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडलेल्या नोकरदारांची चांगलीच धांदल उडाली. लोकल ट्रेन सेवा संथ गतीने सुरू असून सखल भागातील रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे.
प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
पुढील २४ तासांत पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज लक्षात घेता, नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सूचना पालघर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. तसेच नदी-नाल्यांकाठच्या व धोकादायक क्षेत्रातील रहिवाशांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.