फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा मृत्यू
मुंबईतील सायन परिसरातील टॉवरवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती
आत्महत्या पूर्वी हातावर लिहिली सुसाईड नोट
वरिष्ठांच्या छळामुळे आत्महत्या केल्याची माहिती
Satara Doctor Rajendra Rupanwar Sucide Update News साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका डॉक्टरने टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईतील सायन परिसरातील एका टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी म्हणजेच काल त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेने माळशिरस तालुक्यातील त्यांच्या गावातील नागरिक आणि नातेवाईकांनी फलटणकडे धाव घेतली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राजेंद्र रुपनवर यांचे मूळ गाव माळशिरस आहे. ते फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत होते. दरम्यान गेल्या महिन्यात एका राजकीय पक्षाशी संबंधित काही व्यक्तींनी डॉ. रुपनवर यांच्यावर राजकीय दबाव टाकून फिटनेस प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. प्रमाणपत्र देण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर संबंधितांनी त्यांच्याशी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचे सांगितले जाते. याबाबत डॉ. रुपनवर यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती.
मात्र, संबंधितांवर कारवाई होण्याऐवजी डॉ. रुपनवर यांच्यावरच कारवाई करून त्यांचा पगार थांबवला गेला. या प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालेल्या डॉ. रुपनवर यांनी सोशल मीडियावर वरिष्ठांकडून होत असलेल्या कथित पिळवणुकीबाबत व्हिडिओ शेअर केला होता. न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच काही व्यक्तींची नावे त्यांनी डायरीत नमूद केल्याचे समोर आले आहे.
वरिष्ठांच्या छळाला कंटाळून डॉ. रुपनवर यांनी टोकाचा निर्णय घेत मुंबईतील सायन येथील एका टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. यादरम्यान ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान आत्महत्येपूर्वी डॉ. रुपनवर यांनी त्यांच्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये ‘माझा संशयित मृत्यू झाल्यास जबाबदार व्यक्ती प्रसाद कोंडे-देशमुख’ असा मजकूर लिहिला होता.
डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर माळशिरस तालुक्यातील त्यांच्या गावातील नागरिक आणि नातेवाईकांनी फलटणकडे धाव घेतली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, नातेवाईक मुंबईहून डॉ. रुपनवर यांचे पार्थिव घेऊन फलटणच्या दिशेने रवाना झाले आहेत. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संबंधित व्यक्तींना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा उपजिल्हा रुग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा नातेवाईकांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांचे नाव समोर आल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. डॉ. रुपनवर यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीत डॉ. मदने दोषी आढळल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्यावर आजच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.