उल्हास नदीपात्रात छटपूजेच्या आयोजनासाठी परवानगीशिवाय मातीचा भराव टाकल्याच्या प्रकरणाची अखेर महसूल विभागाने दखल घेतली आहे. साम टीव्हीने हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या सात दिवसांत समाधानकारक खुलासा आणि सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश नगरपरिषदेला देण्यात आले आहेत. अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.
छटपूजेच्या उत्सवासाठी उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. नदीपात्रात अशा प्रकारे परवानगीशिवाय भराव टाकल्याने नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे पर्यावरणाचेही मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या प्रकाराविरोधात सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर, मनसे पदाधिकारी यांनी आवाज उठवला होता. साम टीव्हीनेही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला.
या वृत्ताची दखल घेत तहसीलदार कार्यालयाने अखेर नगरपरिषदेला नोटीस बजावली आहे. नदीपात्रात मातीचा भराव नेमका कोणाच्या परवानगीने टाकण्यात आला? तो टाकण्यामागचा उद्देश काय होता? यासह संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, सात दिवसांत नगरपरिषदेकडून समाधानकारक उत्तर आणि अहवाल प्राप्त न झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आता नगरपरिषद या नोटिसीला काय उत्तर देते आणि नदीपात्रातील अवैध मातीचा भराव कधी हटवला जातो, याकडे बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.