

दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान मुंबईत अतिरिक्त बेस्टच्या बसेस धावणार
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी विशेष व्यवस्था
बसमध्ये पुढील दारातून प्रवेशाची विद्यार्थ्यांना मुभा
गर्दी नियंत्रणासाठी प्रमुख स्थानकांवर निरीक्षकांची नियुक्ती
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचता यावे यासाठी बेस्ट प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या काळामध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये अतिरिक्त बसेस धावणार आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्याचे विद्यार्थ्यांचे टेन्शन दूर झाले आहे.
फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा घेण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीला सुरू होणार असून ती ११ मार्चपर्यंत असणार आहे. तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत असणार आहे. मुंबईमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचता यावे आणि त्यांचा प्रवास गर्दी मुक्त व्हावा यासाठी बेस्ट प्रशासनाने अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विशेष नियोजन देखील करण्यात आले आहे.
बेस्ट प्रशासनाने यासंदर्भात विभागीय आणि आगार व्यवस्थापकांना स्पष्ट सूचना देखील दिल्या आहेत. एखाद्या विशिष्ट मार्गावर विद्यार्थी आणि पालकांकडून मागणी असल्यास तात्काळ जादा बस उपलब्ध करून देण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासन प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त बस फेऱ्या वाढवू शकतात.
महत्वाचे म्हणजे, या काळामध्ये विद्यार्थ्यांना एक विशेष मुभा देखील देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बसमध्ये चढताना होणारी धावपळ टाळण्यासाठी त्यांना पुढील दारातून प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. त्याचसोबत बसचालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत सौजन्याने वागणे आणि प्रवासादरम्यान त्यांना पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना बेस्ट प्रशासनाकडून दिल्या आहेत. या काळामध्ये गर्दी नियंत्रणासाठी प्रमुख बस स्थानकांवर निरीक्षक आणि अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.