मागील आठवड्यात पावसाने राज्यातील अनेक भागात विश्रांती घेतली होती. गेले काही दिवस पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरला होता. त्यानंतर आठवड्याच्या सुरुवातीला सोमवार पासून मुंबईसह उपनगरात आणि राज्यातील विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात देखील पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली असून हवामान खात्याने रेड अलर्ट जरी केला आहे. तसेच कोकणात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
पुण्यात पावसाने जोर धरला असून पुढील ३ तासांत पुणे आणि सातारा येथील घाट क्षेत्रात वादळांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. तसेच जोरदार पावसाने कोयना धरणात पाण्याचा साठा वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहे.
दुसरीकडे कोकणात भात लावणीला सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. लांजा तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. दरम्यान काजळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने लांजा तालुक्यातील अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे.
काजळी नदी पात्रा बाहेर आल्यामुळे दत्त मंदिराच्या परिसरात मोठया प्रमाणात पाणी आहे. रात्रीपासूनच लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दत्त मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून, दत्त मंदिर परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी आहे.
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये देखील पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाबळेश्वर, पोलादपुर परिसरात कोसळणाऱ्या जोरदार पावसाने सावित्री नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. केवळ तीन तासात तीन मिटर पाणी पातळी वाढली असून प्रशासन सतर्क झाले आहे. सावित्री नदीच पाणी लाटांप्रमाणे किनाऱ्यावर आदळत आहे. दरम्यान हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदाजवळ दरड कोसळल्यामुळे तिथली वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरड हटवण्याचे काम स्थानिक प्रशासना कडून युद्ध पातळीवर सुरू आहे. मुसळधार पाऊस असल्याने ही दरड बाजूला करण्यास प्रशासनाकडून वेळ लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.