Raj Thackeray on Iran Israel conflict : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, पंतप्रधानांकडून काही महत्त्वाच्या गोष्टी राहून गेल्या आहेत. इराणने आपल्याला संकटाच्या काळात नेहमीच साथ दिली आहे. आपल्याला मिळणारे कच्चे तेल इराणकडून येते आणि तेही त्यांनी रुपयांत दिले आहे. मात्र, खामेनी गेल्यानंतर आणि इराणवर हल्ले होत असतानाही भारताने साधे निषेधाचे पत्रही काढले नाही. जो देश अडचणीत आपल्या पाठीशी उभा राहिला, त्याच्यासाठी आपण उभे न राहणे हे भविष्यात आपल्याला त्रासदायक ठरेल.
आपण केवळ टाळ्यांसाठी बोलत नसून महाराष्ट्राच्या हितासाठी उभे आहोत, असे यावेळी राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी यावेळी जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले. जानेवारीतील सभेत मी अनेकांचे वाभाडे काढले होते, पण लोक लवकर विसरतात. आपण नेमके कुठे चाललो आहोत आणि देशाची प्रगती कुठे होत आहे, हे समजून घेण्याची गरज आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
सत्तेत येणार म्हणजे येणारच...
महाराष्ट्राचे हरवलेले गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आपण सत्ता घेणार म्हणजे घेणारच, हा माझा शब्द नसून आत्मविश्वास आहे, असा ठाम निर्धार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर बोलताना व्यक्त केला. पक्षाच्या २० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीसह आंतरराष्ट्रीय राजकारणावरही भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.
योगायोग अन् शुभसंकेत, काय म्हणाले ठाकरे
राज ठाकरे म्हणाले की, ९ मार्च २००६ रोजी पक्षाची स्थापना झाली आणि १९ मार्च २००६ ला पहिली जाहीर सभा याच शिवतीर्थावर झाली होती. आज या घटनेला २० वर्षे पूर्ण होत असतानाच योगायोगाने १९ मार्च रोजी गुढीपाडवा आला आहे. हा आगामी काळासाठी एक शुभसंकेत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. येत्या तीन वर्षात आता निवडणुका नाहीत. त्यामुळे सर्वच जण कंत्राटदारांकडून पैसे खाण्यात मोकळे आहेत. सध्या देशात भीतीचे वातावरण असून भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनता गॅसच्या तुटवड्यामुळे अडचणीत आली असल्याचे ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.