भारतीय रेल्वेचा नवा नियम
ट्रेन सुटण्याच्या १५ मिनिटांपूर्वीपर्यंत उपलब्ध सीट्सचे आरक्षण करता येणार
आयआरसीटीसी वेबसाइट, मोबाईल ॲपद्वारे बुकिंगची सुविधा उपलब्ध
वंदे भारतसह अनेक आरक्षित गाड्यांतील रिकाम्या जागांसाठी नवा नियम लागू
शेवटच्या क्षणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची संधी
भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेससह काही आरक्षित गाड्यांमधील रिकाम्या जागांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार, आरक्षण तक्ता (चार्ट) तयार झाल्यानंतरही ट्रेनमध्ये रिकाम्या जागा उपलब्ध असल्यास प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या अवघ्या १५ मिनिटांपूर्वीपर्यंत तिकीट बुक करता येणार आहे. या निर्णयामुळे शेवटच्या क्षणी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी आरक्षण तक्ता तयार झाल्यानंतर ऑनलाइन किंवा नियमित आरक्षण प्रक्रिया बंद होत होत्या. त्यामुळे चार्ट तयार झाल्यानंतर काही जागा रिकाम्या राहिल्या तरी त्या इतर प्रवाशांना उपलब्ध होत नव्हत्या. मात्र, नव्या व्यवस्थेमुळे अशा रिकाम्या जागा प्रवाशांसाठी खुल्या राहतील आणि त्यांचे आरक्षण करता येईल. रेल्वे प्रशासनाच्या मते, या निर्णयामुळे गाड्यांमधील रिकाम्या जागांची संख्या कमी होईल आणि अधिकाधिक प्रवाशांना आरामदायी प्रवासाची संधी मिळेल. विशेषतः व्यवसाय, नोकरी, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा कौटुंबिक कारणांमुळे अचानक प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांसाठी हा नियम फायदेशीर ठरणार आहे.
अनेकदा प्रवाशांना शेवटच्या क्षणी प्रवास करावा लागतो. अशावेळी वेटिंग तिकीट किंवा उपलब्धतेअभावी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. आता मात्र ट्रेन सुटण्याच्या १५ मिनिटांपर्यंत उपलब्ध जागांची माहिती तपासून कन्फर्म तिकीट मिळवण्याची संधी त्यांना मिळणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी प्रवासापूर्वी सीट उपलब्धता तपासणे आवश्यक आहे. तसेच, तिकीट बुकिंग आणि बोर्डिंग प्रक्रियेसाठी वेळेत स्टेशनवर पोहोचणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रेल्वेने स्पष्ट केले आहे की, प्रवासी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइट, आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाईल ॲप किंवा प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) काउंटरच्या माध्यमातून तिकीट बुक करू शकतात. मात्र, चार्ट तयार झाल्यानंतर संबंधित गाडीत जागा प्रत्यक्षात रिक्त असल्यासच ती आरक्षणासाठी उपलब्ध होईल. रेल्वेच्या या नव्या उपक्रमामुळे शेवटच्या क्षणी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी हा निर्णय निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.