सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी
Loni Kalbhor toddler death due to contractor negligence : पुण्यासह राज्याला मुसळधार पावसाने झोडपलेय. पुण्यासाठी पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दिवसरात्र कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेय. लोणी काळभोरमध्ये खड्ड्यात बुडून २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला आपला जीव गमावावा लागल्याची घटना घडली आहे. सोहम लखन कसबे असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कसबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकी घटना काय?
परिसरात सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी एका ठेकेदाराकडून काम सुरू होते. या कामासाठी रस्त्याशेजारी चार मोठे खड्डे खोदण्यात आले होते. मात्र, हे काम पूर्ण न करता आणि खड्ड्यांच्या भोवती कोणतीही सुरक्षा भिंत किंवा बॅरिकेड्स न लावता ठेकेदाराने हे खड्डे तसेच उघडे सोडून दिले होते.
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे या उघड्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. नेहमीप्रमाणे सोहम आपल्या घरासमोर खेळत असताना, त्याचे लक्ष गेले नाही आणि तो या पाण्याच्या खड्ड्यात पडला. खड्डा खोल असल्याने आणि त्यात पाणी असल्याने सोहमचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
काम अर्धवट सोडताना तिथे कोणतीही सुरक्षा यंत्रणा किंवा धोक्याची सूचना देणारे फलक लावले नव्हते. ठेकेदाराच्या याच बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अज्ञात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.