पुणे ग्रामीण पोलिसांनी आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला
पोलिसांनी चार आरोपींना अटक केली
आरोपींविरुद्ध दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे २० गंभीर गुन्हे
सचिन जाधव, पुणे
पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एका रात्रीत पाच ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे तब्बल २० गंभीर गुन्हे उघडकीस आले असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून पुणे ग्रामीण परिसरातील दौंड, बारामती, जुन्नर, जेजुरी, माळेगाव आणि आळेफाटा या भागांमध्ये जबरी चोरी व दरोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. १० जून रोजी दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रात्रीत चार ठिकाणी आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते. या घटनांनंतर पोलिसांनी विशेष तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता.
गुप्त माहिती आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांत छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान गणेश मंगेश काळे, विशाल हंबरड्या काळे आणि किशोर रावण भोसले यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी प्रवीण उर्फ पप्पू भोसले आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सुमारे २७ तोळे सोन्याचे दागिने, ३२४ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी अनेक गुन्ह्यांची कबुली दिल्याचे समोर आले असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या टोळीशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.