महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती गेल्या आठवडाभरापासून ठप्प
हवामान विभागाने ११ जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला
राज्यातील अनेक भागांत उष्णता आणि उकाड्याचा त्रास कायम
२५ जून ते १ जुलैदरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता
Maharashtra Weather Update Today 18th June 2026 राज्यात अर्धा जून संपला तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मॉन्सून राज्यात दाखल झाला असला तरी त्याची प्रगती मागील आठवडाभरापासून ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये उष्णता आणि उकाड्याचा त्रास वाढला असून नागरिकांना अस्वस्थ करणारे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मान्सून येत्या ८ दिवसांत महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. आज काही जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून उर्वरित भागांत उकाड्याचा त्रास कायम आहे. दरम्यान जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाचे डोळे देखील पावसाच्या वाटेकडे लागले आहेत.
भारतीय हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, पुणे, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, उर्वरित राज्यातही अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, मात्र व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनच्या प्रगतीला पोषक हवामान प्रणालींचा अभाव हे प्रमुख कारण मानले जात आहे. अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावल्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सूनची आगेकूच गेल्या आठ दिवसांहून अधिक काळापासून थांबली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
देशातील इतर भागांमध्ये मात्र मॉन्सूनची प्रगती सुरू आहे. सोमवारी मॉन्सूनने संपूर्ण आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा तसेच पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये पुढे सरकला. पुढील चार ते पाच दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून येत्या काही दिवसांत मॉन्सून पुन्हा सक्रिय होईल का, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार २५जून ते १ जुलै यादरम्यान मान्सून महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.