पुण्यातील नवले पूल भागात एका व्यावसायिकाची गाडी अडवून तब्बल १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याच्या प्रकरणात खळबळजनक वळण लागलं आहे. या दरोड्याच्या गुन्ह्यात नऱ्हे पोलिसांनी एका तोतया पत्रकाराला बेड्या ठोकल्या असून तर ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खेड शिवापूर पोलीस चौकीतील एका महिला पोलीस हवालदारासह पोलीस शिपायाला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. सध्या हे दोघे ही जणं फरार असल्याची माहिती आहे.
पुण्यात एक कोटी रुपयांच्या दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. पण तोतया पत्रकारासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांचं बिंग फुटलं. या प्रकरणात पोलीसच दरोडेखोरांच्या भूमिकेत होते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. याबाबत फिर्यादी हर्षवर्धन पवार यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सगळा प्रकार, १८ जुलै रोजी पुण्यातील नवले पूल परिसरात घडला. फिर्यादी पवार हे सहकारी किरण आपटे यांच्यासह एका वाहनाने नवले पुलाजवळ असलेल्या बँकेच्या दिशेने जात असताना काही जणांनी त्यांचे वाहन अडवले. आम्ही पोलिस आहोत, तुम्ही बेकायदेशीर पैसे घेऊन जात आहात, असे सांगत आरोपींनी गाडीचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले आणि वाहनातील एक कोटी रुपयांची रोकड असलेल्या दोन बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आपटे यांनी ७३ लाख रुपयांची बॅग घेऊन तेथून निघून गेले आणि ही रक्कम वाचली. यानंतर आरोपींनी पवार यांच्या गाडीत बसून त्यांना थेट खेड शिवापूर पोलिस चौकीत नेलं. त्याठिकाणी त्यांच्या ताब्यातील दुसऱ्या बॅगेतील २६.५० लाख रुपयांपैकी २० लाख रुपये काढून घेण्याचा प्रयत्न झाला. महिला पोलिसाच्या मदतीने आणि एका पत्रकाराने ती रक्कम स्वत:च्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. मात्र, प्रकरण आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी ती रक्कम पुन्हा बॅगेत ठेवली. खेड शिवापूर पोलिस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी समोरील हॉटेलमधील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला.
सुरुवातीला दोन पोलिसांची आणि तोतया पत्रकाराची नावं गुन्ह्यातून टाळली गेली. मात्र, नंतर पुरवणी गुन्ह्यात ती नावं पोलिसांनी समाविष्ट करावी लागली. अटक करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आशिष तिवारी असून याप्रकरणात यापूर्वीच विक्रम चाकणकर, अमेय कार्ले आणि गणेश कदम यांना अटक करण्यात आली आहे. नवले पूल तसेच इतर भागांचे सीसीटिव्ही (CCTV) तपासल्यानंतर पोलिसांच्या दरवाजापर्यंत ही चक्रे फिरली आहेत. तपासादरम्यान राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजित इरफू मेस्री यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील चौघांना अटक ही करण्यात आली आहे. मात्र दोन पोलिस कर्मचारीसह सहा जण अजूनही फरार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.