पुणे म्हाडाच्या गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ ऑक्टोबरवरून ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली
अर्जदारांच्या मागण्या आणि कागदपत्र पडताळणीतील विलंब लक्षात घेऊन मुदत पुन्हा वाढवण्यात आली
१५ टक्के सामाजिक आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनांसाठी ही मुदतवाढ
सचिन जाधव,पुणे
पुण्यात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या १५ टक्के सामाजिक आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनांमध्ये सदनिका मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २२ऑक्टोबरवरून पुन्हा एकदा वाढवण्यात आली असून, आता इच्छुकांना ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. कागदपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेला होत असलेला उशीर आणि अर्जदारांकडून करण्यात येणारी मुदतवाढीची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हाडाच्या या योजनांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत दोन लाख ११ हजार ४१४ नागरिकांनी अर्जदार म्हणून नोंदणी केली आहे. त्यापैकी एक लाख ४१ हजार ४१७ जणांनी अॅडव्हान्स रक्कम भरली आहे. त्यामुळे या गृहनिर्माण योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, अर्ज प्रक्रियेत आवश्यक असलेल्या कागदपत्रांची ऑनलाइन तपासणी वेळेत पूर्ण होत नसल्याने अनेक अर्जदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्जदारांनी 'आयएचएलएमएस २.०' या ऑनलाइन प्रणालीवर सादर केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची तसेच उत्पन्नाच्या दाखल्याची पडताळणी महाआयटीमार्फत केली जाते. या सर्व प्रक्रियांना उशीर होत असल्याने अर्जदारांना अर्ज सादर करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, अशी मागणी होत होती. तांत्रिक प्रक्रियेतील अडथळे आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी लागणारा वेळ विचारात घेऊन म्हाडाने अर्ज भरण्याच्या मुदतीत तिसऱ्यांदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या निर्णयानुसार, आता ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची संधी आहे. त्यामुळे अद्याप अर्ज प्रक्रिया पूर्ण न केलेल्या नागरिकांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, त्यांची पडताळणी पूर्ण करून घेणे आणि अर्ज भरण्यासाठी वेळ मिळणार आहे. इच्छुक अर्जदारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.