

पुणे शहराला ४ वर्षांनंतर महापौर आणि उपमहापौर मिळाले
भाजपच्या मंजुषा नागपुरे महापौर तर आरपीआयचे परशुराम वाडेकर उपमहापौर
राष्ट्रवादी आणि काँग्रेसने माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध
पुणे शहराला तब्बल ४ वर्षांनंतर आज महापौर आणि उपमहापौर मिळाला. पुणे महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक पार पडली. पुणे महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने माघार घेतली. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली. भाजपकडे पूर्ण बहुमत असल्यामुळे मंजुषा नागपुरे पुण्याच्या महापौर झाल्या. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे परशुराम वाडेकर बिनविरोध उपमहापौर झाले आहेत.
पुणे महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार शितल सावंत आणि काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी लांडगे यांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेतल्यानंतर मंजुषा नागपुरे यांनी गळाभेट घेतली. पुण्यात भाजपाचे गटनेते गणेश बिडकर यांची शिष्टाई कामी आली. भाजपच्या मंजुषा नागपुरे पुण्याच्या नविन महापौर झाल्यामुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापौर निवडीचा केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव आज मांडला जाणार आहे.
पुणे महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपचे सर्वाधिक ११९ नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे २७, काँग्रेसचे १५, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे १, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ३ उमेदवार विजयी झाले. महापौरपदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तर राष्ट्रवादीकडून शीतल सावंत यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. तर उपमहापौरपदासाठी दत्ता बहिरट, काँग्रेसकडून अश्निनी लांडगे आणि साहिल केदारी यांनी अर्ज भरला होता.
मंजुषा दीपक नागपुरे या भाजपच्या नगरसेविका आहे. त्या राष्ट्रसेविका समितीच्या सेविका आणि प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्या आहेत. आयटी कंपनीत आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग आहे. २०१२ मध्ये नवश्या मारुती, हिंगणे प्रभागातून महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडणूक लढवत विजयी झाल्या होत्या. त्यावर्षी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून भाजपकडून नियुक्ती झाली.
महापालिका निवडणुकीमध्ये मंजुषा नागपुरे या २०१२,२०१७ मतांनी वजयी झाल्या. तर २०२६ मध्ये महापालिकेतील पहिल्या बिनविरोध नगरसेविका म्हणून त्या विजयी झाल्या. पुण्यातील भाजपच्या पहिला बिनविरोध नगरसेविका होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांचे पती दीपक नागपुरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि विश्व हिंदू परिषदेच्या विविध जबाबदाऱ्यांवर काम केले असल्यामुळे घरातूनच संपर्क, संघटन, अंत्योदयसह राजकीय विषयांचे बाळकडू मंजुषा यांना मिळाल. मंजुषा नागपुरे यांनी सिंहगड रस्ता परिसरात सर्वांगीण विकासाची कामं केली आहेत. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल, सन-सिटी कर्वेनगर पूल, पर्यायी रस्ते, यासाठी अथक पाठपुरावा करून कामे प्रत्यक्ष घडवून आणली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.