

लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट
सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी हत्या केल्याचा आरोप
४ जून रोजी हत्येचा कट आखण्यात आल्याचा दावा
केतन अग्रवालच्या हत्याप्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. केतनची होणारी बायको सिया आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांनी मिळून केतनची हत्या केली.आता दोघांबद्दल नवा खुलासा झाला आहे. चेतन आणि सिया यांनी केतनला मारण्याचा प्लॅन याआधीही रचला होता, असा धक्कादायक माहिती केतनच्या कुटुंबियांनी दिली आहे.
केतन अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला आम्हालाही हा अपघात वाटला होता. सियाने आम्हाला चुकीची माहिती दिली होती. एका उंच कड्यावरून केतनचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला, असं तिने सांगितलं होतं. परंतु केतनच्या मृत्यूनंतर सियाचं वागणं आणि तिने सांगितलेल्या गोष्टीत मोठा विरोधाभास वाटू लागला. त्यामुळे केतनचा अपघात नाही तर त्याची हत्या झाली असावी असा संशय आम्हाला आला असं विशाल अग्रवाल म्हणाले. याआधीही सियानं केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी तो एका झाडामुळे वाचला होता. त्यावेळी सियाने आपण केतनला सापापासून वाचवत होतो, असं सांगितलं होतं, असं विशाल अग्रवाल म्हणाले.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि केतन अग्रवाल १८ जूनच्या सकाळी लोहगड किल्ल्यावर गेले होते. तेथील एका कड्यावरून केतन सुमारे ४०० फूट खोल दरीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याचा तपास करताना सियाने पोलिसांना माहिती दिली की, फोटो काढत असताना केतनचा पाय घसरला आणि तो किल्ल्याच्या कड्यावरून खाली पडला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर केतनच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या मित्रांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून केतनची हत्या झाल्याचा संशय येऊ लागला. एका ट्रेकरचा अशाप्रकारे मृत्यू झाला या गोष्टीवरूनच पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचूकली. यासह अग्रवाल कुटुंबियांनीही या घटनेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या दृष्टीकोनातून या प्रकरणाचा तपास सुरू केला.
सुरुवातीच्या तपासात पोलिसांना हा अपघात वाटला. परंतु तपासात पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले ज्यामुळे त्यांना ही हत्या असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी लोहगडावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना एक तरुण दिसला होता, ज्याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. तो तरूण भर उन्हात हुडी जॅकेट घालून किल्ल्यावर फिरत होता. तो आपला चेहरा सतत लपवत होता. या सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला. पोलीस तपासात तो सियाचा प्रियकर असल्याचं उघडकीस आलं.
पोलीस अधीक्षक गिल म्हणाले की, गुप्त खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे याप्रकरणात धक्कादायक खुलासा झाला. सिया गोयल आणि सीसीटीव्हीत दिसलेला तरुण या दोघांचे प्रेमसंबंध आहेत. सीसीटीव्हीत दिसलेल्या तरुणाचे नाव चेतन चौधरी आहे. सिया आणि चेतन यांचे एका वर्षापासून एकमेकांच्या प्रेमात होते. त्या दोघांनी केतनची हत्या करण्याचा कट रचला. त्याप्रमाणे त्यांनी केतनला लोहगड किल्ल्यावर सियानं आणलं आणि एका खोल दरीत ढकलून दिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.