Pune Land Scam: पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा, बनावट सह्या अन् खोटी ओळखपत्रे वापरून शेती हडपली

Pune News: पुण्यात मोठा जमीन घोटाळा उघड झाला. गावकऱ्यांच्या खोट्या सह्या आणि ओळखपत्रे वापरून शेती हडप करण्यात आली. या प्रकरणी ८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत.
Pune Land Scam: पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा, बनावट सह्या अन् खोटी ओळखपत्रे वापरून शेती हडपली
Pune Land ScamSaam Tv
Published On: 

सागर आव्हाड, पुणे

भोर तालुक्यातील सांगवी (वेळवंड खोरे) आणि साळुंगण येथील वडिलोपार्जित जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात बनावट सह्या, खोटी ओळखपत्रे आणि बोगस व्यक्तींचा वापर करून जमीन हडपल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाईक एन्व्हायर्नमेंट इन्स्टिट्यूट लिमिटेडचे चेअरमन कमांडर दीपक दिगंबर नाईक यांच्यासह ८ जणांविरोधात भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन व्यवहारात फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे, जातिवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.

याप्रकरणी संदीप तुकाराम जगताप (वय ५० वर्षे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादी नुसार, सांगवी आणि साळुंगण परिसरातील अनेक गट क्रमांकांमधील जमीन ही त्यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. या जमिनीवर त्यांच्या कुटुंबासह भावकीतील इतर सदस्यांचाही सामाईक हक्क आहे. मात्र, कुटुंबातील काही सदस्यांनी जमीन विक्रीला संमती दिलेली नसताना आणि कोणताही मोबदला मिळालेला नसताना जमिनीचे खरेदीखत तयार करून सातबारा उताऱ्यावर परस्पर इतरांची नावे लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

खोटी भीती दाखवून सह्या आणि अंगठे घेतल्याचा आरोप -

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, २०१३-१४ च्या सुमारास त्यांच्या जमिनीवर काही व्यक्ती तार कंपाउंड करण्यासाठी आले होते. याबाबत विचारणा केली असता ही जमीन दीपक दिगंबर नाईक यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी संबंधित जमीन व्यवहाराची माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी भावकीतील काही शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले की, शशिकांत रामभाऊ कंक आणि बाजीराव शिळीमकर यांनी तुमच्या नावावर जास्त जमीन असल्यास वनविभागाचा शिक्का पडू शकतो, अशी भीती दाखवली होती. त्यानंतर खातेफोड करून देण्याच्या बहाण्याने त्यांना भोर तहसील कार्यालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्या सह्या आणि अंगठे घेण्यात आले. मात्र, आम्ही जमीन विकलेली नाही आणि आम्हाला कोणताही मोबदला मिळालेला नाही, असे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

Pune Land Scam: पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा, बनावट सह्या अन् खोटी ओळखपत्रे वापरून शेती हडपली
Pune Crime: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'सोबत भयंकर घडलं, ५ लाखांच्या कारसाठी सासरच्यांकडून छळ

खरेदीखतांमध्ये बनावट सह्या आणि अंगठ्यांचा वापर?

या व्यवहाराची माहिती घेण्यासाठी संदीप जगताप यांनी भोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून खरेदीखत दस्त क्रमांक २१५६/२००८ आणि २१५७/२००८ यांच्या प्रती मिळवल्या. त्यांची पाहणी केल्यानंतर अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला आहे. खरेदीखतावर काही व्यक्तींच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तींनी अंगठे केल्याचा, मृत व्यक्तींच्या जागी त्यांच्या नातेवाइकांनी अंगठे केल्याचा तसेच काही व्यक्तींच्या नावाने बनावट सह्या करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे. याशिवाय, संबंधित व्यवहाराच्या वेळी जिवंत असलेल्या काही व्यक्तींच्या जागी दुसऱ्या व्यक्तींनी सही किंवा अंगठा केल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.काही व्यवहारांमध्ये कुलमुखत्यारपत्रधारक म्हणून शशिकांत रामभाऊ कंक यांनी सही केल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित जमिनीच्या मूळ हक्कदारांच्या संमतीशिवाय आणि त्यांच्या वारसांच्या सह्या न घेता खरेदीखते तयार करून जमिनीची नोंद इतरांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप आहे.

अनेक गट क्रमांकांतील जमिनींचा व्यवहार फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, मौजे सांगवी येथील गट क्रमांक ७३, ७४, ४०/१, ४५, ५३/१, ४८ आणि ४६ तसेच मौजे साळुंगण येथील गट क्रमांक २, १/१०, १/४, १/७, ३ आणि १९ या जमिनींचा वाद या प्रकरणाशी संबंधित आहे. सांगवी येथील काही जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर फेरफार क्रमांक ३५७ नुसार अमोल पांडुरंग पाटील यांच्या नावाने विविध क्षेत्रांची नोंद झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. त्यापैकी काही जमीन पुढे इतर व्यक्तींना विक्री करण्यात आल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, या पुढील व्यवहारांची कागदपत्रे त्यांनी अद्याप मिळवलेली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. या संपूर्ण व्यवहारातून मूळ जमीनधारकांची फसवणूक करून त्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Pune Land Scam: पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा, बनावट सह्या अन् खोटी ओळखपत्रे वापरून शेती हडपली
Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

जातिवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी -

जमिनीच्या व्यवहाराला विरोध केल्यानंतर दीपक दिगंबर नाईक यांनी गावातील चौकात ग्रामस्थांसमोर जातिवाचक शब्दांत शिवीगाळ केली. तसेच जमिनीबाबत पुन्हा विचारणा केल्यास घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही संदीप जगताप यांनी केला आहे.संबंधित जमीन महार वतनाची असल्याची माहिती असतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करण्यात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. त्यामुळे हा केवळ जमिनीच्या खरेदी-विक्रीचा वाद नसून, अनुसूचित जातीतील जमीनधारकांची फसवणूक आणि त्यांच्यावर जातीय अत्याचार झाल्याचा आरोपही या तक्रारीतून पुढे आला आहे.पुनर्वसन आणि भरपाईचे आश्वासन देऊन तक्रार करण्यापासून रोखल्याचा दावा

या प्रकरणातील संबंधित व्यक्तींनी २०१३-१४ पासून पुढे अनेक वेळा संपर्क साधून आमच्याकडून चूक झाली असल्याचे मान्य केले. तुमचे पुनर्वसन करू आणि समाधानकारक भरपाई देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून इतकी वर्षे तक्रार केली नाही. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही समाधानकारक भरपाई किंवा पुनर्वसन न करता जमिनीची विक्री सुरूच ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर पोलिसांकडे धाव घेतल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

Pune Land Scam: पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा, बनावट सह्या अन् खोटी ओळखपत्रे वापरून शेती हडपली
Pune Crime: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'सोबत भयंकर घडलं, ५ लाखांच्या कारसाठी सासरच्यांकडून छळ

८ जणांविरोधात गुन्हा दाखल -

या प्रकरणात शशिकांत रामभाऊ कंक, बाजीराव शिळीमकर, नाईक एन्व्हायर्नमेंट इन्स्टिट्यूट लिमिटेडतर्फे चेअरमन कमांडर दीपक दिगंबर नाईक, अमोल पांडुरंग पाटील, राजेंद्र रामभाऊ कंक, सिद्धार्थ किसन जगताप, बबन धोंडिबा जगताप आणि बबन लक्ष्मण जगताप अशा आठ जणांची नावे फिर्यादीत नमूद करण्यात आली आहेत. भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.आता या प्रकरणातील खरेदीखतांची सत्यता, सह्या व अंगठ्यांची पडताळणी, संबंधित फेरफार नोंदी, जमिनीच्या मूळ मालकीचे पुरावे आणि व्यवहारातील आर्थिक देवाणघेवाण यांचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. पोलिसांच्या तपासातून या कथित जमीन व्यवहारातील नेमके सत्य समोर येणार आहे.

Pune Land Scam: पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा, बनावट सह्या अन् खोटी ओळखपत्रे वापरून शेती हडपली
Pune Crime: लोणी काळभोरमध्ये माजी सरपंचाची गुंडगिरी! हॉटेलमध्ये घुसून मालकासह कामगारांना बेदम मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.