

पुण्यातील श्रीराम्स आयएएस क्लासेसकडे १० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
पुण्यात आयएएस क्लास संचालकाला खोट्या तक्रारींची धमकी
तक्रारी मागे घेण्यासाठी क्लास संचालकाकडे दहा लाखांची मागणी
पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस चालवणाऱ्या संचालकाकडे तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी क्लास चालकाला धमकावण्यात आले. याप्रकरणी क्षितिज बर्वे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून माऊली डुचाळ या तरुणाविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे पुण्यातील नारायण पेठ परिसरात 'श्रीराम्स आयएएस' (Shriram's IAS) नावाने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस आहेत. सारथी, महा ज्योती, बार्टी आणि टार्टी या शासकीय संस्थांची ही अकॅडमी संलग्न आहे. त्यांच्याकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी या क्लासच्या माध्यमातून दिली जाते. संबंधित क्लास चे मुख्यालय दिल्ली मध्ये असून देशभरातील प्रमुख शहरांमध्ये याच्या अनेक शाखा असून हजारो विद्यार्थी या क्लासच्या माध्यमातून आयएएस आणि आयपीएस झाले आहेत.
पोलिस उपआयुक्त कृषिकेश रावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर या कालावधीत घडला. आरोपी माऊली डुचाळने फिर्यादी यांच्या मोबाईलवर फोन आणि मेसेज करून "तुमची तक्रार पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे" असं सांगितलं. आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलेल्या तक्रारींचे फोटो सुद्धा फिर्यादी यांना पाठवले.
प्रथमता या संस्थेने या फोन आणि मेसेजला दुर्लक्षित केले होते. एके दिवशी आरोपीने आपण स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असल्याचे देखील फिर्यादी यांना कळवलं. "दिलेल्या तक्रारी मागे घ्यायच्या असतील तर दहा लाख रुपये" द्या अशी मागणी केली. "जर पैसे दिले नाहीत तर आणखी खोट्या तक्रारी करून त्रास देऊ त्रास देऊ," असं देखील फिर्यादी यांना धमकवण्यात आलं.
या सगळ्या प्रकरणानंतर फिर्यादी यांनी आमच्या क्लासमध्ये असे कुठलेही प्रकार चालत नसल्याचं आरोपीला स्पष्ट केल्यानंतर सुद्धा फिर्यादी यांना बघून घेऊ अशी धमकी देण्यात आली. या प्रकारानंतर संबंधित क्लास ने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८ आणि ३५१ अन्वये माऊली डुचाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षा किंवा अन्य शैक्षणिक परीक्षांचे क्लासेस मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या क्लासेसच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून प्रामुख्याने आयएएस आयपीएस किंवा राज्यसेवा परीक्षा तसेच एमपीएससी मधील परीक्षा देणाऱ्यांचे विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे सहाजिकच या संदर्भातील अनेक क्लासेस शहराच्या मध्यवर्ती भागात कार्यरत आहेत.
संबंधित प्रकरणातून अशा काही क्लासेसला किंवा क्लास चालवणाऱ्या चालकांना यापूर्वी देखील धमक्या आल्या होत्या का किंवा या क्लास संचालकांकडून खंडणी उकळली आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यासह राज्यातल्या अनेक क्लासेस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून क्लास चालकांकडून खंडणी उकळल्याच एक मोठं रॅकेट देखील समोर येण्याची शक्यता असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.
पुणे पोलिसांनी स्पर्धा परीक्षा चालवणाऱ्या क्लास चालकांना आवाहन केलं आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून पुण्यातील एका क्लास चालकाने समोर येऊन तक्रार दिली असल्यामुळे आम्हाला कारवाई करता आली. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आम्ही यामध्ये कोणी अन्य जणांचा सहभाग असला तर त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. यासोबतच काही क्लास चालकांना खंडणी मागितल्याचे फोन किंवा मेसेज यापूर्वी आले असतील किंवा अशा कुठल्याही घटनांना क्लास चालक बळी पडले असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असं देखील आवाहन पोलिसांनी केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.