

महिला पोलीस भरतीसंदर्भात महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
शारीरिक चाचणीदरम्यान मासिक पाळी आल्यास महिला उमेदवारांना मुदतवाढ मिळणार
आरोग्य तपासणीनंतर ५ ते ६ दिवसांची अतिरिक्त मुदत दिली जाणार आहे.
महिला पोलीस भरतीसंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीदरम्यान जर तरुणींना मासिक पाळी आली तर अशा उमेदवारांना आरोग्य तपासणीनंतर ५ ते ६ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो तरूणींना दिलासा मिळालाय.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुणी या वर्षभर प्रचंड मेहनत घेतात. पहाटे उठून सराव करणे आणि मैदानी चाचणीसाठी स्वतःला झोकून देतात. मात्र, ज्या खाकी वर्दीचे स्वप्न त्याने पाहिले होते, ती वर्दी मिळवण्यच्या दिवशीच जर मासिक पाळी आली तर सर्व वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरते. त्यामुळे भरतीची संधी वाया जात असते. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे तरुणींची संधी हुकणार नाही.
मासिक पाळीच्या काळात अनेक तरुणींना हातापायात गोळे येणे, तीव्र पोटदुखी, चक्कर, अशक्तपणा याचा त्रास होत असतो. अशावेळी 100 मीटर आणि 800 मीटर धावण्याची चाचणी, गोळाफेक तसेच लांबउडी सारख्या शारीरिक चाचणी परीक्षा देताना अडचणी येत असतात. अनेक तरुणींमध्ये मासिक पाळी येण्याची धास्ती असते. त्यामुळे त्यांना भरतीची संधी गमावण्याचे टेन्शन असते. त्यामुळे या गोष्टींचा विचार करुन आता राज्य सरकारने पोलीस भरतीतील तरुणींच्या शारीरिक चाचणीच्या वेळी जर मासिक पाळी आली असेल तर त्यांच्या मैदानी चाचण्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर घेण्यात येणार आहे.
सरकारच्या या निर्णयाचं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अनेक तरुणींनी स्वागत केलंय. तरुणींना मासिक पाळीमुळे चाचणीच्या दिवशी अपेक्षित कामगिरी करता येत नाही, त्यामुळे सरकारच्या या निर्णामुळे आता संधी हुकणार नाही, असे म्हणत निर्णय दिलासादायक असल्याची भावना व्यक्त केली आहे. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे या प्रक्रियेमुळे पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणींच्या मेहनतीवर अन्याय होऊ नये, यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.