सचिन जाधव
सायबर क्राईमच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट बनवून फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह देशातील इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने आरोपीने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले होते. (Latest Marathi News)
शाहरुख खान असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. पुणे सायबर पोलिसांनी त्याला राजस्थानमधून अटक केली आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. फिर्यादींना पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने फेसबुक रिक्वेस्ट आली होती. राजेश देशमुख बोलत असल्याचे भासवून त्यांचा मित्र संतोष कुमार, सीआरपीएफमध्ये कार्यरत असून त्यांचे जुने फर्निचर कमी किंमतीत विकत असल्याचे सांगितले.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर आरोपीने जुने फर्निचर विकत घेण्यासाठी ७०,००० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगीतले. फिर्यादी यांनी रक्कम आरोपीने दिलेल्या बँक अकाऊंटवर ट्रान्स्फर केली. मात्र फर्निचर काही मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचं समजताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
पुणे सायबर पोलिसांनी राजस्थानमधील अलवर या ठिकाणी पथक पाठवून राजस्थान बहादुरपूर गावातून शहारुख खानला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने देशातील अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकार्यांचे बनावट प्रोफाइल फेसबुकवर बनवून लाखो रुपये उकळले असल्याची कबुली दिली आहे.अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.