

पुण्यात विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला
वाघोलीतील रायसोनी कॉलेजसमोर विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला
विद्यार्थ्याच्या डोक्यात कोयता अडकला
जुना वादातून विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला
घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर
पुण्यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यावर टोळक्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. पुण्यातील वाघोलीमध्ये ही घटना घडली. कॉलेजबाहेरच या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील रायसोनी कॉलेजसमोर ही घटना घडली. नागेश जगताप या विद्यार्थ्यावर टोळक्यांनी कोयत्याने हल्ला केला. नागेश आपल्या मित्रांसोबत हॉटेलबाहेर चहा पिण्यासाठी बसला होता. त्याचवेळी त्याठिकाणी काही जण आले आणि त्यांनी नागेशवर कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की आरोपीने मारलेला कोयता थेट विद्यार्थ्याच्या डोक्यातच अडकून राहिला. या कोयत्यासह त्याला रुग्णालयात नेण्यात आले. या रक्तरंजित हल्ल्याचा थरार हॉटेल बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, नागेश जगताप आपल्या मित्रासोबत हॉटेलबाहेर चहा पिण्यासाठी थांबला होता. त्याच वेळी जुना वाद मनात धरून मंगेश सांगळे हा आपल्या दोन साथीदारांसह तिथे आला. सुरुवातीला नागेश आणि मंगेश या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. “तू मला शिवी का दिली?” असा जाब विचारत मंगेशने अचानक नागेशवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली.
नागेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. मंगेशने मारलेला कोयता नागेशच्या डोक्यात अडकून राहिला. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. एका आरोपीला पोलिसांनी अटक केली तर दोघांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.