सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी
Pune kidnapping attempt CCTV : पुणे शहरात महिला आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कात्रज-कोंढवा रोडवरील गर्दीच्या सुखसागरनगर परिसरात एका १८ वर्षीय तरुणीची छेडछाड करून तिला भरदिवसा बळजबरीने उचलून नेण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मात्र, ऐन वेळी स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठा अनर्थ टळला.
संतप्त नागरिकांनी नराधम आरोपीला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जितू किशोरीलाल सरोज (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या मवाली आरोपीचे नाव आहे.
नक्की काय घडली घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही थरारक घटना शनिवारी सायंकाळी घडली. संबंधित १८ वर्षीय तरुणी सुखसागरनगरमधील समर्थ डेअरीसमोर आपल्या मैत्रिणीची वाट पाहत थांबली होती. ती एकटीच असल्याचे पाहून नराधम जितू सरोज तिच्याजवळ आला. त्याने अत्यंत विकृतपणे तरुणीची छेड काढली. त्याने थेट तिच्या छातीला हात लावला आणि शर्ट ओढून तिला बळचकीने उचलून नेण्याचा प्रयत्न केला.
या अचानक झालेल्या हल्ल्याने आणि अपहरणाच्या प्रयत्नाने तरुणी हादरली, पण तिने प्रचंड धाडस दाखवत जोरदार आरडाओरडा सुरू केला.
तरुणीचा किंकाळी आणि आरडाओरडा ऐकून तिची मैत्रीण आणि आजूबाजूला असलेले स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. प्रकार लक्षात येताच संतापलेल्या नागरिकांनी एका क्षणाचाही विलंब न करता त्या नराधमाला पकडून चोप दिला. यादरम्यान आरोपीने मग्रुरी दाखवत एका व्यक्तीचा मोबाईल जमिनीवर आपटून फोडला आणि नुकसान केले. जमावाने आरोपीला बेदम चोप दिला अन् पोलिसांना बोलावले.
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून आरोपीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. भरवस्तीत घडलेल्या या धक्कदायक प्रकारामुळे पुणेकर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.