अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी
Ashok Chavan Congress comeback news : काँग्रेस पक्ष सोडलेले देशातील पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसमध्ये 'घरवापसी' करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. यावर भाष्य करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी, "अशोक चव्हाण यांच्या संदर्भात राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र राग आहे," असे विधान केले आहे. देशातील राजकीय वातावरण बदलायला सुरुवात झाल्यामुळे अनेक जण आता काँग्रेसच्या मूळ प्रवाहात येण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांच्या घरवापसीबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे 'हायकमांड'च घेईल, असेही ते म्हणाले.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार होते, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे ७५ आणि महाविकास आघाडीचे एकूण १६० आमदार निवडून येतील, असा अहवाल 'इंटेलिजन्स ब्युरो'ने (IB) सरकार आणि विरोधकांना दिला होता, असा दावा त्यांनी केला.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सभेत ते बोलत होते. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेनंतर अचानक वाढवण्यात आलेल्या बोगस मतदानाच्या आकडेवारीद्वारे महाविकास आघाडीला सत्तेपासून रोखण्याचा कट रचला गेला, असा थेट आरोप त्यांनी 'महायुती'वर केला. यासोबतच, येत्या काळात महागाईचा मोठा उद्रेक होणार असून पेट्रोलचे दर प्रतिलिटर ४०० रुपयांचा टप्पा ओलांडू शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे प्रस्तावित असलेल्या ३,००० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीवरून त्यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. या प्रकल्पासाठी ३५ हजारांहून अधिक झाडे कापली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकल्पाचे कंत्राट असलेल्या 'टोरेंट कंपनी'चे प्रमुख (मेहता नावाचे गृहस्थ) हे अमित शाह यांच्या निकटवर्तीय असल्याचा आरोप पटोलेंनी केला. "मोदी आणि फडणवीस सरकारला महाराष्ट्राचे वाळवंट करू देणार नाही. कर्जत येथील वृक्षतोड त्वरित थांबली नाही, तर काँग्रेस तिथे तीव्र आंदोलन उभारेल," असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.