

पुण्यात आयटीआयच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घटना
आरोपी आणि मृत विद्यार्थी एकाच वर्गात शिक्षण घेत होते
झोपेत असताना मित्रावर चाकूने वार करत संपवण्यात आले
पुण्यामध्ये विद्यार्थ्याने वर्गमित्राची निर्घृण हत्या केली. झोपेत असलेल्या तरुणावर चाकूने सपासप वार करत जागीच संपवण्यात आले. ही घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये घडली. मैत्रीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील गोणवडी आयटीआयमध्ये ही घटना घडली. आरोपी आणि हत्या करण्यात आलेला तरुण एकाच वर्गात शिकत होते. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल होता. या वादातूनच सौरभ संतोष साखरे (२३ वर्षे) नावाच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. शुभम कदम असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेनंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील वाढत्या हिंसक प्रवृत्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शुभम कदम आणि सौरभ साखरे दोघे एकाच वर्गात शिक्षण घेत होते. गुरूवारी रात्री सौरभ आयटीआयच्या इमारतीवरील टेरेसवर झोपला होता. त्याचवेळी शुभम तिथे आला. त्याने झोपलेल्या सौरभवर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये सौरभ गंभीर जखमी झाला. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दोघांमध्ये नेमका वाद काय झाला होता याचा तपास पोलिस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी आरोपी शुभम कदमला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. मित्राच्या हातूनच मित्राची झालेली हत्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शिक्षणाच्या माहेरघरात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे विद्यार्थ्यांमधील वाढती आक्रमकता, क्षुल्लक कारणांवरून हिंसाचाराकडे झुकणारी मानसिकता आणि महाविद्यालयीन स्तरावरील गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.