चाकण औद्योगिक वसाहतीत सकाळच्या शिफ्टच्या वेळी मोठी वाहतूककोंडी
पुणे-नाशिक महामार्गावर ५ ते ७ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
कामगार, नोकरदार, प्रवासी आणि वाहनचालकांना तासन्तास कोंडीत अडकावे लागले
वाढती वाहनसंख्या आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे चाकणमध्ये वारंवार कोंडी
चाकण औद्योगिक वसाहतीतील पुणे-नाशिक महामार्गावर सकाळपासूनच वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सकाळच्या शिफ्टच्या वेळी वाहनांची संख्या अचानक वाढल्याने महामार्गावर तब्बल पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कामगार, प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं.या वाहतूक कोंडीमुळे नोकरदार वर्गाला आज लेट मार्क लागण्याची शक्यता आहे.
पुण्यातील चाकण औद्योगिक परिसरात दररोज मोठ्या संख्येने कामगार आणि नागरिकांची ये-जा असते. सकाळच्या वेळेत कंपन्यांच्या शिफ्ट सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या वेळेत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्याचा थेट परिणाम पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर होताना दिसतो. वाहतूक संथ झाल्याने काही वाहनचालकांना तासन्तास कोंडीत अडकून पडावं लागत आहे.
या वाहतूककोंडीचा सर्वाधिक फटका कामावर जाणाऱ्या कामगारांना बसत आहे. वेळेत कंपनीत पोहोचण्यासाठी निघालेल्या अनेकांना वाहतूककोंडीमुळे उशीर होत आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिकांनाही या कोंडीतून मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेला वेळेत मार्ग न मिळाल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीत दिवसेंदिवस वाढणारी वाहनसंख्या आणि त्यामानाने अपुरी असलेली वाहतूक व्यवस्था यामुळे कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्या, तरी काही वेळाने पुन्हा त्याच ठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याचं चित्र आहे. औद्योगिक परिसराचा वाढता विस्तार आणि भविष्यात आणखी वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता, केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करण्याची गरज आहे.
रस्त्यांची क्षमता, वाहतूक व्यवस्थापन, जड वाहनांची स्वतंत्र व्यवस्था आणि आपत्कालीन वाहनांसाठी मोकळा मार्ग याबाबत ठोस नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दररोज हजारो कामगार आणि प्रवाशांना या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असताना, चाकणची ही कोंडी अखेर कधी सुटणार? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.