पुण्यातील आळंदी परिसरात ६ गुंतवणूकदारांकडून ३३ लाख ४४ हजार ४२५ रुपये उकळले
एका लाखाच्या गुंतवणुकीवर दररोज ५०० रुपये परताव्याचे आमिष दाखवल्याचा आरोप
पती-पत्नीविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत
आर्थिक गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सहा जणांकडून तब्बल ३३ लाख ४४ हजार ४२५ रुपये जमा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात पती-पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत गंगाधर पऱ्हाड आणि धनश्री भागवत पऱ्हाड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आळंदी जवळील धानोरे फाटा येथे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत चऱ्होली खुर्द येथील राहुल भोलेनाथ भोसले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. राहुल भोसले आणि त्यांचा भाऊ गौरव भोसले यांच्याकडून १५ लाख ७४ हजार ४२५ रुपये, चऱ्होली खुर्द येथील योगेश ज्ञानेश्वर वंजारी यांच्याकडून १ लाख ७० हजार रुपये, धानोरे येथील बांधकाम व्यावसायिक यशवंत गावडेकडून १० लाख रुपये, तर शुभम लोखंडे आणि मोनिका लोखंडेकडून ६ लाख रुपये अशा एकूण ३३ लाख ४४ हजार ४२५ रुपयांची रक्कम गुंतवणुकीच्या नावाखाली घेतल्याचा आरोप आहे.
एका लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दररोज ५०० रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. तसेच शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी परतावा मिळणार नसल्याचे सांगण्यात आले होते. सुरुवातीला काही काळ परतावा देण्यात आला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. मात्र त्यानंतर परतावा देणे बंद करण्यात आले. गुंतवणुकीची मूळ रक्कम परत मागितल्यानंतरही पती-पत्नीने टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
धनश्री पऱ्हाड यांचे धानोरे फाटा येथे चिरायू क्लिनिक असून भागवत पऱ्हाड यांचे ‘श्रीभा कलेक्शन’ नावाचे कपड्याचे दुकान होते. राहुल भोसले यांचे मोबाईल शॉपीचे दुकान त्यांच्या शेजारी असल्याने दोन्ही कुटुंबांची ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत गुंतवणुकीची योजना सांगण्यात आल्याचा आरोप आहे. पैसे परत मागितल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. अखेर राहुल भोसले यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.