

चाकणमध्ये खड्ड्यांमुळे गेला महिलेचा मृत्यू
खड्ड्यामुळे दुचाकी घसरली आणि महिला खाली पडली
पाठीमागून आलेल्या ट्रकने महिलेला चिरडले
अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला
पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था आता जीवघेणी ठरत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांनी एका महिलेचा जीव घेतला. चाकण येथील एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेची दुचाकी खड्ड्यांमुळे घसरली. रस्त्यावर पडलेल्या या महिलेला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. चाकाखाली चिरडून या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे चाकण एमायडीसीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चाकण एमआयडीसीतील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधांमुळे गेल्या एका वर्षांत तब्बल ३९९ जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे ते स्पायसर चौक या मार्गावर सॅनी इंडिया कंपनीजवळ अपघाताची ही घटना घडली. महिला दुचाकीवरून घरी निघाली होती. दुचाकी घसरून महिला रस्त्यावर पडली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने महिलेला जोराची धडक दिली. चाक अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. सानवी सचिन पांचाळ (वय ४२ वर्षे) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलेचे नाव होते.
ही महिला स्कोडा कंपनीत सिक्युरिटी फोर्समध्ये काम करत होती. या अपघाताची माहिती मिळताच महाळुंगे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सानवी पांचाळ ही कामगार महिला तिच्या दुचाकीवरून कंपनीतून सुटल्यानंतर घरी जात होती. पुणे -नाशिक महामार्गावरील स्पायसर चौक या बाजूकडे ती महिला येत होती. दुचाकीवरून जात असताना तिची दुचाकी चिखल आणि खड्ड्यामुळे घसरली. त्यामुळे ती रस्त्यावर पडली. त्यानंतर पाठीमागून आलेल्याट्रकने तिला चिरडले.
वाहनाचे चाक महिलेच्या अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. सानवी पांचाळ ही महिला तिच्या कुटुंबीयासह भोसरीतीस इंद्रायणीनगर येथे राहत होती. या दुर्दैवी घटनेने अनेकांनी संताप व्यक्त केला. अपघातानंतर वाहन चालक वाहन घेऊन पळून गेला. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत असून वाहन चालकाचा शोध घेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.