केडीएमसी निवडणुकीपूर्वी कल्याणमध्ये मोठा पक्षप्रवेश
काँग्रेस व मनसेतील नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर जोरदार टोला
शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
सध्या राज्याच्या राजकारणात वेगवेगळे चढउतार सुरु आहेत. पक्षा-पक्षांमध्ये फोडाफोडी सुरु असून ऐन निवडणुकीच्या तोंडांवर पक्षप्रवेशांना उधाण आले आहे. अशातच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा टांगा पलटी झाला असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांचे घोडेही फरार होतील, असा जोरदार टोला लगावला. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह मनसे आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या अनुषंगाने त्यांनी हा टोला लगावला.
केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, जान्हवी पोटे, मनसेचे माजी नगरसेवक कौस्तुभ देसाई, कस्तुरी देसाई यांच्यासह काँग्रेस, मनसे व उबाठा गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत असताना कोण टीका करतंय, टोमणे मारतंय याकडे आम्ही लक्ष देत नाही. आरोपाला आरोपातून नाही तर कामातून उत्तर देतो. टीकेला टीकेतून नाही तर विकासातून प्रत्युत्तर देतो.
सचिन पोटे हे लढवय्ये आणि प्रामाणिक कार्यकर्ते असून त्यांनी जिथे काम केले तिथे मनापासून योगदान दिले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. सचिन पोटे यांच्या प्रवेशाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीम आणखी मजबूत झाली आहे. या टीममध्ये आधीच धोनी, विराट, रोहित होते; आता सचिन पोटे यांची एन्ट्री झाली आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महायुतीच जिंकणार, याबाबत कोणताही संशय नाही,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून येथे कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. सचिन पोटे यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
पक्षप्रवेशानंतर सचिन पोटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मी २५ वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले. आता शिवसेनेत अधिक उर्मीने काम करीन. काँग्रेस सोडण्याचा निर्णय भावनिक होता; मात्र लोकांशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेचा विचार पक्का झाला. काँग्रेस नगरसेवक असतानाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विकासकामांसाठी मोठा निधी दिल्याचे त्यांनी नमूद केले आणि शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
सचिन पोटे यांच्यासह जान्हवी पोटे, किशोर देसाई, कस्तुरी देसाई, विमल ठक्कर, शकील खान, उबाठा गटाच्या आशा रसाळ, प्रविण साळवे, लिओ, माजी नगरसेवक फैजल जलाल, यतिन जावळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.