मत्त्यापूर येथे ऊसाच्या शेतात मादी बिबट्याचा मृतदेह आढळला
चारही पाय कापलेले; १८ नखे गायब असल्याने संशय बळावला
मृत्यू ३-४ दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज
पोस्टमार्टेम अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार
ओंकार कदम, सातारा
सातारा तालुक्यातील मत्त्यापूर येथील बरड शिवारात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शेतकरी रविंद्र आबाजी घोरपडे यांच्या ऊसाच्या शेतात चारही पाय तोडलेल्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
घोरपडे यांच्या शेतात गेल्या चार दिवसांपासून ऊसतोडीचे काम सुरू होते. शुक्रवारी,दिनांक १२ रोजी सकाळी कामगार ऊस तोडत असताना शेताच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या दाट व निसरड्या भागात त्यांना बिबट्याचा मृतदेह दिसून आला. अचानक समोर आलेल्या या दृश्यामुळे कामगार घाबरून गेले आणि त्यांनी तत्काळ ही माहिती शेतमालकाला दिली.
घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल संदीप जोपळे व वनकर्मचारी अभिजित कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आले असून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली. बिबट्या मादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचे चारही पाय पंज्यापासून कापण्यात आले असून सर्व मिळून तब्बल १८ नखे गायब आहेत.मात्र तिच्या मिशा व सर्व दात सुस्थितीत असल्याचे आढळून आले आहे.
ही बिबट्या मादी अंदाजे तीन ते चार वर्षांची ही मादी असल्याचे वनअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की घातपात ? शिकारीच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला आहे का ? अशा अनेक प्रश्नांनी या घटनेभोवती गूढ निर्माण झाले आहे. पोस्टमार्टेम अहवालानंतरच या रहस्याचा उलगडा होणार आहे. बिबट्याचा मृतदेह पुढील तपासासाठी सातारा येथे पाठवण्यात आला असून वनविभागाकडून सखोल चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.