संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
धैर्य, त्याग आणि अटूट बंधुत्वाची हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने आपल्या धाकट्या पोलीस भावाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा एक भाग दान केला आहे.ही जीवनदायी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात डॉ. स्वप्निल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. लोहमार्ग पोलीस दलातील संतोष रोकडे या मोठ्या भावाने मुंबई पोलिसात असलेल्या नित्यानंद रोकडे या लहान भावाचा यकृत दान करून त्याचा जीव वाचवला आहे.
मुंबई पोलीस दलातील ३८ वर्षीय धाकटा भाऊ नित्यानंद अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला तीव्र अक्यूट-ऑन-क्रॉनिक लिव्हर फेल्युअर चा त्रास होता. तीव्र पिवळेपणा, रक्तदाब टिकवण्यासाठी औषधांची गरज अशी त्याची प्रकृती होती. त्याच्या जगण्याची एकमेव आशा म्हणजे तातडीचे यकृत प्रत्यारोपण करणे होय. क्षणाचाही विलंब न लावता, लोहमार्ग पोलिस दलात कार्यरत असलेला त्याचा मोठा भाऊ संतोष रोकडे जिवंत दाता म्हणून पुढे सरसावला.
दाता भावाने सांगितले, पोलिस म्हणून आम्हाला इतरांचे प्राण वाचवण्याचे प्रशिक्षण दिले जाते स्वतःचा धोका पत्करूनही. पण यावेळी ती वर्दी किंवा कर्तव्याची बाब नव्हती; तो माझा धाकटा भाऊ होता. जर मी त्याला आयुष्याची दुसरी संधी देऊ शकत असेन, तर माझ्या मनात कोणताही प्रश्न नव्हता. त्यानेही माझ्यासाठी हेच केले असते.
सखोल वैद्यकीय तपासणीनंतर मोठा भाऊ दानासाठी योग्य असल्याचे आढळले. शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती, परंतु ती यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यासाठी शल्यविशारद, भूलतज्ज्ञ, अतिदक्षता तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, विशेष प्रशिक्षित ICU परिचारिका, आहारतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट अशा बहुविद्याशाखीय लिव्हर ट्रान्सप्लांट पथकाने काटेकोर समन्वय साधला.
डॉ. स्वप्निल शर्मा म्हणाले, अक्यूट-ऑन क्रॉनिक लिव्हर फेल्युअरमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट ही आमच्यासाठी सर्वात आव्हानात्मक शस्त्रक्रियांपैकी एक असते. या प्रकरणात केवळ वैद्यकीय गुंतागुंत नव्हे, तर दोन भावांचे असामान्य भावनिक बळही ठळकपणे दिसून आले. प्रेम, त्याग आणि विज्ञान यांनी एकत्र येत मृत्यूवर मात केलेली ही दुर्मीळ घटना आहे.
दोन्ही भावांनी कल्याण मध्ये पत्रकार परिषद घेत ही संपूर्ण कथा माध्यमांसमोर मांडली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.