

'ओल्ड मंक' (Old Monk) च्या विक्रीवर घालण्यात आलेल्या प्रतिबंधांमुळे महाराष्ट्र सरकारला तब्बल ३५० कोटी रुपयांच्या महसुलाचा फटका बसल्याचा दावा कंपनीने केला आहे. या संपूर्ण वादामुळे मद्यप्रेमींमध्ये आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी होणार आहे. या प्रकरणामुळे राज्य शासनाच्या महसुलावर आणि संबंधित उत्पादकांच्या व्यवहारावर मोठा परिणाम झाल्याचे समोर आले आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) प्रतिबंधात्मक आदेशाला आव्हान देणाऱ्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर हे निवेदन सादर करण्यात आले . रमची उत्पादक कंपनी मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर प्रा. लि. ने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाला माहिती दिली. आता यावर सुनावणी होणार आहे. हा वाद FSSAI च्या त्या निर्णयामुळे सुरू झाला. FSSAI ने नियमानुसार उत्पादन दाखवून स्पिरिट्समध्ये बाहेरून रमचा स्वाद (Flavor) मिसळणाऱ्या लोकप्रिय मद्य उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली होती.
सोमवारी मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर प्रा. लि. कडून ज्येष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, ठाणे जिल्ह्यातील युनिटच्या विक्रीवर निर्बंध आल्यामुळे कंपनीला ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला आहे. त्याशिवाय यामुळे उत्पादन शुल्क विभागालाही (Excise Department) महसुलात सुमारे ३५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील इतर युनिट्सकडूनही अगदी याच प्रकारच्या रमची विक्री केली जात होती, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर उत्तर देताना, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी पुन्हा स्पष्ट केले की, कंपनीने उत्पादनावरील लेबलवर 'रम' ऐवजी Rum-like असा बदल करण्यास मान्यता दिली, तरच अधिकारी या विक्रीला परवानगी देतील.
FSSAI ची भूमिका:
FSSAI ने असा दावा केला आहे की कृत्रिम किंवा नैसर्गिक रम फ्लेवरिंगचा (स्वाद) वापर केल्यामुळे स्पिरिटचे मूळ नैसर्गिक घटक झाकले जातात. जोपर्यंत अशा उत्पादनावर 'फ्लेवर्ड उत्पादन' (Flavored Product) किंवा 'रम फ्लेवर असलेले स्पिरिट' असा स्पष्ट उल्लेख असणारे लेबल लावले जात नाही, तोपर्यंत ते उत्पादन निकृष्ट दर्जाचे ठरते आणि यामुळे ग्राहकांची दिशाभूल होते.
याशिवाय, उत्पादनाच्या लेबलवर '७ इयर्स ओल्ड ब्लेंडेड' (7 Years Old Blended) आणि 'व्हेरी ओल्ड व्हॅटेड' (Very Old Vatted) यांसारख्या परिपक्वतेबाबत (Maturity) दिशाभूल करणाऱ्या वर्णनांचा वापर करण्यात आल्यामुळे FSSAI ने 'ओल्ड मंक'च्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
कंपनीचा युक्तिवाद:
कंपनीने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, नियमांनुसार मान्यताप्राप्त घटकांसह न्यूट्रल स्पिरिटचा वापर करण्यास पूर्ण परवानगी आहे. तसेच, बाजारातील इतर प्रतिस्पर्धी कंपन्याही अशाच प्रकारची उत्पादन प्रक्रिया वापरत असताना, त्यांच्यावर मात्र कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.