पुणे: महापालिका निवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. उमेदवारांची नावे जाहीर झाल्याने शहरात ठिकठिकाणी सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रचाराचा वेग आला आहे. पुण्यात मध्यवर्ती भागासह उपनगरात जोरदार प्रचार रॅली, कोपरा सभा, पत्रक वाटप असे विविध कार्यक्रम उमेदवारांकडून राबवले जात आहेत.
पुणे शहरात एकूण ४१ प्रभाग आहेत ज्यामधून १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. पुण्यात भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस - शिवसेना उबाठा - मनसे अशी चौरंगी लढत होणार आहे. पुणे महापालिकेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ची युती झाली आहे असं असलं तरी हे दोन्ही पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांना आव्हान देताना दिसत आहे. यातील एक उदारहण म्हणजे पुण्यातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये असणारा "ब" वॉर्ड. या वॉर्ड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षातूनच आवाहन आहे.
बाणेर-बालेवाडी-सूस पाषाण या प्रभाग ९ मधील "ब" वॉर्ड मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन "तगडे" उमेदवार रिंगणात आल्यामुळे या प्रभागाची जोरदार चर्चा आहे. पुणे शहरात दोन्ही राष्ट्रवादीची युती असली तरी सुद्धा काही प्रभाग याला अपवाद आहेत त्यातील एक म्हणजे प्रभाग क्रमांक ९ मधील हा वॉर्ड.
या वॉर्ड मधून बाबुराव चांदेरे जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तसंच याच वॉर्ड मध्ये त्यांना आव्हान देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अवघ्या २४ वर्षाचे जयेश मुरकुटे यांची जोरदार तयारी सुरू आहे. आता हे दोघे राष्ट्रवादीचे असले तरी सुद्धा याच वॉर्ड मधून अपक्ष निवडणूक लढवणारे प्रमोद निम्हण सुद्धा रिंगणात उतरले आहेत.
अजित पवारांनी ऐन वेळेला डावलले प्रमोद निम्हण नेमके कोण?
प्रमोद निम्हण हे अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात तसेच ते राष्ट्रवादीचे नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच या ठिकाणी निम्हण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पक्ष पातळीवर या संदर्भात अनेक बैठका सुद्धा झाल्या. मात्र, ऐनवेळी निम्हण यांना डावलण्यात आले आणि बाबुराव चांदेरे यांना पक्षाने उमेदवारी दिली. निम्हण यांच्यासह अनेक स्थानिकांनी या निर्णयाचा निषेध केला. निम्हण यांना उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ पाषाणमध्ये गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला आणि याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले. त्यामुळे निम्हण यांनी थेट निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. निम्हण आता "शिट्टी" या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
भाजप: रोहिणी चिमटे, गणेश कळमकर, मयुरी कोकाटे, लहू बालवडकर
राष्ट्रवादी काँग्रेस: गायत्री मेढे कोकाटे, बाबुराव चांदेरे, पर्वती निम्हण, अमोल बालवडकर
काँग्रेस: संदीप बालवडकर, जीवन चाकणकर
शिवसेना उबाठा: ज्योती चांदेरे
मनसे: मयूर सुतार
दोन्ही 'राष्ट्रवादी' १३ जागांवर आमने सामने
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भाजपवर आणि महापालिकेतील भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका होत असून, महापालिकेची निवडणूक ही 'महायुती' तच आतापर्यंत रंगली असल्याचे चित्र आहे. त्यात पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षालाही आपल्या सोबत घेतले असले तरी ते एकमेकांसमोर १३ जागांवर लढत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र आल्यास नवल वाटणार नसल्याचे चित्र सध्या दिसून येतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ४३ उमेदवार उभे केले आहेत. त्यातील ३४ जागांवर ते तुतारी चिन्हावर लढत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.