विकास काटे, साम टीव्ही
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात एक धक्कादायक दुर्घटना घडली असून, जुन्या इमारतीचा गॅलरीचा स्लॅब कोसळल्याने 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंब्र्यातील अमृतनगर परिसरात जनता बेकरीजवळ दर्गा गल्ली येथे ही घटना सोमवारी (27 जुलै) सायंकाळी सुमारे 7.16 वाजण्याच्या सुमारास घडली. फय्याज अपार्टमेंट ही तळमजला अधिक चार मजली आणि सुमारे 38 वर्षे जुनी इमारत असून, तिच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब अचानक कोसळून थेट पहिल्या मजल्यावर पडला.
या दुर्घटनेत एकूण सहा जण स्लॅबखाली अडकले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष, टीडीआरएफ, पोलीस आणि टोरंट पॉवरच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ बचावकार्य सुरू केले.
बचाव पथकाने सर्व अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. यापैकी पाच जणांना किरकोळ दुखापत झाली असून ते सुरक्षित आहेत. मात्र, गंभीर जखमी झालेल्या १३ वर्षीय आस्मा कादर शेख हिला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव फैय्याज अपार्टमेंटमधील सर्व रहिवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. या इमारतीतील सुमारे ७० ते ८० रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ७८ आणि १२३ येथे करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.